एकीकडे आयपीएलचा रणसंग्राम सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज के. एल राहुलसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. के एल राहुलची पत्नी आथिया शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अथियाने ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे.
क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी पालक झाले आहेत. आज म्हणजेच 24 मार्च रोजी या अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही जोरदार कमेंट्स केल्या असून सर्वजण के एल राहुल आणि आथियाला अभिनंदन करत आहेत.
अथिया शेट्टीने आज संध्याकाळी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने मुलीला जन्म झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर लिहिले आहे, 'आम्ही एका मुलीचे पालक झालो आहोत...' अथियाची ही पोस्ट आता जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदन केले आहे.
अथियाच्या या पोस्टवर अभिनेत्री कियारा अडवाणीनेही कमेंट केली आहे. तसेच यावर खास कमेंट करताना अर्जुन कपूरने , 'अभिनंदन मित्रांनो.' असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय पंजाबी गायक जस्सी गिलनेही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अथियाच्या पोस्टला काही मिनिटांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान, आयपीएल 2025 मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. त्याआधीच म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी वाईट बातमी समोर आली होती. संघातील स्टार खेळाडू केएल राहुल पहिल्या सामन्याला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. के एल राहुल सामना सोडून तातडीने मुंबईला रवाना झाला होता.