Asurvan Movie Trailer: सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत, त्यात आता अजून एका मराठी चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक सचिन आंबात याच्या 'असुरवन' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी याच्या हस्ते मुंबईत पार पडला. या सोहळ्याला दिग्दर्शक सचिन आंबात सह अनुज ठाकरे, दीप्ती धोत्रे, विपुल साळुंखे, विश्वास पाटील, पूजा मौली, व चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते. स्वप्नस्वरूप निर्मित 'असुरवन' हा चित्रपट येत्या ५ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.
फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी
'असुरवन' चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीज़र प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर काही दिवसातच एक मन सुन्न करणारी घटना घडली ती म्हणजे 'असुरवन' चित्रपटातील मुख्य अभिनेता सचिन चांदवडे याच्या निधनाच्या बातमीने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार तसेच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला. परंतु खचून न जाता 'असुरवन' चित्रपटाच्या टीमने हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठीत खूप काहीतरी भारी येत आहे अशी प्रतिक्रिया ट्रेलर पाहून प्रेक्षक देत आहेत.
Gautami Patil Song:' गौतमी पाटीलचा रणरागिणी अवतार! नऊवारी गाण्याने घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सचिन आंबात आहेत. तसेच या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे, गणेश गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'असुरवन' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोकणातील मातीचा गंध पाहायला मिळतोय. कोकणाच्या आदिवासी पाड्यातील प्राचीन वारली संस्कृतीची प्रथा, रूढी, परंपरा या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. कोकणातील एका शापीत घनदाट डोंगर माऊलीवर झालेला फिरसत्या देवाचा कोप तसेच उत्सुकता वाढवणारा सूर्याचा मुखवटा असणारा चेहरा नेमका कोणाचा यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातील “खबर कलली का” या आगरी भाषेतील डायलॉगने या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. त्यात थ्रिलर, गूढ, सस्पेन्स आणि ड्रामा सर्वकाही आहे. ट्रेलरमध्येच या सर्व भावनांची झलक पाहायला मिळाली.
असुरवन चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर...
'असुरवन' चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सचिन आंबात चित्रपटाच्या ट्रेलरविषयी सांगतात, “जेव्हा 'असुरवन' चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीज़र प्रेक्षकांसमोर आला तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा या चित्रपटाकडून वाढल्या होत्या. जेव्हा हा ट्रेलर आम्ही एडिट करत होतो. तेव्हा माझ्या मनात एकच होतं की या चित्रपटाची तिकीटं प्रेक्षकांनी काढली पाहिजे की या चित्रपटातील गूढ, रहस्य, वारली संस्कृती यांची उत्कंठा त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मराठीत अस सस्पेन्स, थ्रिलर शापीत जंगलाची कथा पहिल्यांदाच चित्रपटातून मांडण्यात आली आहे. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आणि माझी खात्री आहे रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”