प्रवीण देवळेकर, प्रतिनिधी
Aaishvary Thackeray : ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकारण. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक विशेष वलय आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे अशी ठाकरेंची तिसरी आणि चौथी पिढी राजकारणात सक्रीय झाली.. पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे, जो बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालंय.. अनुराग कश्यपच्या निशांची या सिनेमातून ऐश्वर्य अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात करणार आहे.
कोण आहे ऐश्वर्य ठाकरे?
बाळासाहेबांचा नातू अशी ऐश्वर्य ठाकरेची ओळख. जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा तो मुलगा आहे. मराठी सिनेसृष्टीत स्मिता ठाकरे यांचीही निर्माता म्हणून नाव आहे. मोठी राजकीय पार्श्वभूमी असुनही ऐश्वर्यला राजकारणात रस नव्हता. अभिनयाकडे ओढा असल्यामुळे त्याने सिनेसृष्टीचं क्षेत्र निवडलं. ऐश्वर्यने याआधी संजय लीला भन्साळीसोबत 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली. या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐश्वर्यने जबाबदारी पार पाडली. आता निशांची चित्रपटातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करतोय.
अनुराग कश्यपने नुकताच निशांची या सिनेमाचा टीझर रिलीज केला. या टीझरमध्ये ऐश्वर्य ठाकरेचा फर्स्ट लूक पाहून सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढलीय. हा सिनेमा गँग्स ऑफ वसेपूरच्या धाटणीतलाच असावा असा अंदाज बांधला जात आहे.
ठाकरेंच्या चौथ्या पिढीचे चार शिलेदार आहेत.. यात आदित्य ठाकरेंनी राजकारणातच आपला जम बसवला. यानंतर अमित ठाकरेदेखील मनसेतून सक्रीय झाले. तेजस ठाकरेंनी मात्र अद्याप राजकारणात रस दाखवलेला नाही. आता ऐश्वर्य ठाकरे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय! )
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंची नेहमीच चर्चा असते. पण ठाकरे कुटुंबात कलेलाही तितकाच वाव आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. राज ठाकरेंनीदेखील हाच छंद जोपासला. उद्धव ठाकरे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यामुळे कलाक्षेत्र ठाकरेंसाठी नवं नाही. ठाकरे कुटुंबातून पहिलीच व्यक्ती सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. आता सिनेसृष्टीतही ठाकरेंचं नाणं खणखणीत वाजणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.