All We Imagine As Light: 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' या भारतीय सिनेमाची जादू पाहायला मिळाली. पायल कपाडिया दिग्दर्शित या फीचर सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार पटकावला आहे. पाल्मे डी'ओर पुरस्कारानंतर 'ग्रँड प्रिक्स' हा फिल्म फेस्टिव्हलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. पायल कपाडिया दिग्दर्शित या सिनेमामध्ये कनी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृधू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पायल कपाडिया यांनी रचला इतिहास
पायल कपाडिया यांच्या सिनेमाचे गुरुवारी (23 मे 2024) रात्री स्क्रीनिंग करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस सिनेमास आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. एखाद्या भारतीय महिला दिग्दर्शकाचा सिनेमा मुख्य स्पर्धेत पोहोचण्याची 30 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.
आठ मिनिटे सुरू होता टाळ्यांचा कडकडाट
ज्यावेळेस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते, त्यावेळेस उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून सिनेमासह कलाकारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. तब्बल आठ मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. संपूर्ण सभागृहांमध्ये टाळ्यांचा आवाज घुमत होता. इतकंच नव्हे तर उपस्थितांकडून 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' सिनेमाच्या टीमला स्टँडिंग ओव्हेशनही मिळाले. एकूणच पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटाने आपल्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये मोठा धमाका केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समीक्षकांचीही वाहवाई लुटली. 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' हा सिनेमा फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धेमध्ये पात्र ठरणारा 30 वर्षांतील पहिला भारतीय चित्रपट आहे.
कोण आहेत पायल कपाडिया?
पायल कपाडिया या भारतीय सिने-दिग्दर्शक आहेत, ज्यांचा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला. पायल यांचा जन्म मुंबई शहरातीलच आहे. पण त्यांनी आंध्र प्रदेश आणि मुंबईमध्येही शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पायलने फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टिट्युटमधून दिग्दर्शनाचे धडे घेतले. आज त्यांनी दिग्दर्शन केलेल्या सिनेमाचे जगभरात कौतुक केले जात आहे.