तेलुगूसह विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या सुपर बजेट सिनेमा काल्की (Kalki2898AD Movie) चा दुसरा भागही येणार आहे. पहिल्या भागामध्ये प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, शोभना यासारखे बड्या कलाकार दिसले होते. प्रभास आणि दीपिका ही या चित्रपटातील मुख्य जोडी होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दीपिका दिसणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वैजयंती मूव्हीजने याबद्दलची घोषणा केली आहे.
नक्की वाचा: 'ते रुप कोणी पाहावे अशी तिची इच्छा नव्हती' प्रिया मराठेचा संघर्ष सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक
निर्मात्यांचे आणि दीपिकाचे काय बिनसले ?
वैजयंती मूव्हीजने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की "दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी' च्या आगामी सिक्वेलचा भाग असणार नाही, हे आम्ही अधिकृतपणे जाहीर करत आहोत. बराच विचार केल्यानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास खूप मोठा असूनही, आम्ही एक चांगली 'पार्टनरशिप' निर्माण करू शकलो नाही. 'कल्की 2898 एडी' सारख्या चित्रपटाला बऱ्याच मोठ्या ‘कमिटमेंट'ची गरज आहे. दीपिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो"
दीपिकाचा 8 तासांच्या शिफ्टचा आग्रह
काही महिन्यांपूर्वी दीपिकाने प्रभाससोबतचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' या चित्रपटातूनही माघार घेतली होती. कामाच्या तासांवरून दोघांमध्ये मतभेद झाले होते. दीपिकाने, 'दुआ'ला जन्म दिल्यानंतर, काम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये संतुलन असावे यासाठी कामाचे फक्त 8 तास असावे अशी मागणी केली होती. ही मागणी निर्माता दिग्दर्शकांना मान्य नव्हती, यामुळे दीपिकाने तो चित्रपट सोडला होता. काल्की चित्रपट सोडण्यामागेही हेच कारण असावे असा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.
नक्की वाचा: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही शूटर पोलिसांकडून ठार
'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दीपिकाने 'सुमती' नावाच्या एका गर्भवती महिलेची भूमिका केली होती, जी विष्णूच्या 10 व्या अवताराला जन्म देणार असते. यामुळे तिच्यामागे यास्कीन नावाचा खलनायक लागलेला असतो असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. दीपिकाऐवजी कोणत्या अभिनेत्रीची या चित्रपटासाठी निवड होणार याची उत्सुकता निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. दीपिका सध्या 'किंग' आणि 'एए22' या आगामी चित्रपटांसाठी काम करते आहे.