Dharmendra Death News Update : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबईतील घरी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिन्यात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर 12 दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबर रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस होणार होता. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या वादाची, म्हणजेच धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का? ही जुनी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
आरोग्याच्या अफवा आणि कुटुंबाची प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रत्येक हालचालीकडे चाहत्यांचे लक्ष असायचे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांच्या आरोग्याबद्दल चिंताजनक बातम्या पसरू लागल्या, तेव्हा चाहत्यांमध्ये धाकधूक वाढली होती. अनेक पोर्टल्सनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे दावे केले होते. मात्र, त्यांची मुलगी ईशा देओलने (Esha Deol) इंस्टाग्रामवर पोस्ट करत या अफवा फेटाळल्या आणि माझे वडील उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत असे स्पष्ट केले. तसेच, प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती केली.
संपूर्ण देश आपल्या लाडक्या 'ही-मॅन'साठी प्रार्थना करत असतानाच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक जुन्या वादग्रस्त प्रकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली, ज्यात त्यांच्या कथित धर्मांतराच्या अफवांचा समावेश होता.
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
पहिल्या विवाहाची पार्श्वभूमी
धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी, म्हणजेच 1954 मध्ये प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्याशी विवाह केला होता. या जोडप्याला सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol), अजीता देओल (Ajeita Deol) आणि विजेता देओल (Vijeta Deol) अशी चार मुले आहेत. सनी आणि बॉबी या दोघांनीही नंतर बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. अनेक वर्षे धर्मेंद्र यांचे वैवाहिक जीवन स्थिर होते आणि कोणतीही चर्चा नव्हती. मात्र, 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याशी वाढत्या जवळीकमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली.
हेमा मालिनी यांच्याशी विवाह आणि धर्मांतराच्या अफवा
1980 मध्ये धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. या कारणामुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा आणि अनेक तर्कवितर्क सुरू झाले. हा विवाह झाल्यानंतर लगेचच, मीडियामध्ये अशी चर्चा पसरली की, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी विवाह करण्याकरिता इस्लाम धर्म स्वीकारला होता. इतकंच नव्हे, तर त्यांनी धर्मांतर केल्यानंतर पुन्हा पारंपरिक अय्यंगार (Iyengar) पद्धतीने विवाह केला, असेही बोलले जात होते. ही चर्चा इतकी वेगानं पसरली की, अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा हा एक महत्त्वाचा आणि सर्वाधिक चर्चेचा विषय होता.
( नक्की वाचा : Dharmendra धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील तिसरी महिला; 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते 'ही-मॅन' )
धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं सत्य
अनेक वर्षे या अफवा पसरत राहिल्यानंतर, अखेर 2004 मध्ये एका मुलाखतीदरम्यान धर्मेंद्र यांनी या विषयावर पहिल्यांदा आपले मत स्पष्ट केले. त्यांनी धर्मांतराचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. ते म्हणाले होते,
"हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी असा माणूस नाही, जो आपले हित साधण्यासाठी आपला धर्म बदलेल.'' असे सांगत धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची अफवा ठाम शब्दात फेटाळून लावली होती.