- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मुंबईत राहत असतानाही आपल्या मूळ गावाशी आणि कुटुंबाशी दृढ नाते जपले
- धर्मेंद्र यांनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीचा मोठा भाग आपल्या पुतण्यांच्या नावावर दिला.
- त्यांनी आपल्या पुतण्यांना जमिनीशी जोडलेल्या भावनांची जाणीव करून दिली.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बाबतच्या अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहिती ही नव्हत्या त्या समोर आल्या आहेत. ते केवळ एक महान कलाकार नव्हते तर ते आपल्या कुटुंबाशी,गावाशी, नातेवाईकांशी दृढपणे जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. मुंबई सारख्या मायानगरित राहून ही त्यांनी आपल्या मूळ गावाचा आणि कुटुंबियांचा विसर पडू दिला नाही. त्यांनी केवळ स्वतःच्या मुलांची जबाबदारीच नाही, तर आपल्या चुलत भावाच्या कुटुंबावरही तितकेच प्रेम केले. धर्मेंद्र यांची त्यांच्या वाट्याची भरपूर जमीन आहे. ही जमीन त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या पुतण्यांच्या नावावर केली. त्यामुळे त्यांना एक मोठा आधार झाला. ही बाबत आतापर्यंत कोणालाही माहित नव्हती हे विशेष.
धर्मेंद्र यांचा जन्म नसराली येथे झाला होता. असं असलं तरी त्यांचे मन नेहमी त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी जास्त लागत होतं. लुधियानाजवळील डांगो इथं ते जास्त रमले. त्यांनी वडिलांची एकच शिकवण ते नेहमी जपून ठेवली होती. ती म्हणजे ‘ही आपल्या पूर्वजांची जमीन आहे, ती सांभाळून ठेव'. वडिलांच्या या शब्दांचा मान राखण्यासाठी आणि गावाशी असलेले नाते जपण्यासाठी धर्मेंद्र यांनी वडिलांच्या वाट्याला आलेली जमीन त्यांच्या काकांच्या मुलांना, म्हणजेच पुतण्यांना दिली आहे. गावात राहणारे पुतणेच हा वारसा योग्य प्रकारे जपून ठेवतील, असा त्यांचा स्पष्ट हेतू होता. त्यामुळे त्यांनी ही सर्व जमीन त्यांना दिली आहे.
( नक्की वाचा : Dharmendra : 'यमला पगला दिवाना' माझा चित्रपट होता, धर्मेंद्र यांचा फोन आला आणि...सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा )
एका अहवालानुसार, धर्मेंद्र यांनी आपल्या पुतण्यांच्या नावावर 2.4 एकर (2.4 acres) जमीन दान केली आहे. हे मोठे दान करताना त्यांनी एकच गोष्ट आपल्या पुतण्यांना सांगितली, ते म्हणतात "तुम्ही माझे रक्त आहात आणि या जमिनीशी माझ्या बाप-दादांच्या भावना जोडलेल्या आहेत." लुधियानातील कपड्यांच्या मिलमध्ये काम करणारे त्यांचे भाचे बूटा सिंह यांनी सांगितले की, "आजच्या काळात कोणी कोणाला अर्धा गुंठा जमीनही देत नाही, पण धर्मेंद्रजींनी आम्हाला इतकी मोठी जमीन प्रेमाने दिली. ते आमच्यासाठी रक्ताप्रमाणे जवळचे आहेत. त्यांनी दिलेला सल्ला आम्ही प्राणपणाने जपू. या जमिनीवर कोणाची ही वाईट नजर जाणार नाही याची काळजी घेवू असं ही ते म्हणाले.
धर्मेंद्र मुंबईत स्थायिक झाल्यावरही कुटुंबाचे हे प्रेम आणि नाते कायम राहिले होते. त्यांच्यासाठी गावावरून खोया, साग, बर्फी आवर्जून मुंबईला पाठवली जात होती. 2013 मध्ये, वयाच्या 78 व्या वर्षी, धर्मेंद्र एका शूटिंगसाठी पुन्हा डांगो गावात आले होते. तेव्हा ते खूप भावुक झाले होते. गावात पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम आपल्या जुन्या मातीच्या घराला भेट दिली होती. दाराजवळची माती कपाळाला लावली होती. त्यानंतर घरात जाऊन ते 10-15 मिनिटे रडले ही होते. गावकऱ्यांनी हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहीलं. धर्मेंद्र यांचं त्यांच्या गावावरही तेवढचं प्रेम होतं.