Dhurandhar Movie Plot Hole: रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. राजकारण, गुन्हेगारी आणि सत्तेचा धोकादायक खेळ, रहमान डकैतची दहशत या गोष्टी प्रेक्षकांना पडद्याला खिळवून ठेवतात. सिनेमाचा वेग इतका जबरदस्त आहे की, त्यातील छोट्या चुकांकडे कोणाचे लक्ष जात नाही. मात्र, काही हुशार प्रेक्षकांनी सिनेमातील एक अशी चूक शोधून काढली आहे, जी यालिना, हमजा आणि जमाल जलाली यांसारख्या महत्त्वाच्या पात्रांशी संबंधित आहे.
यलिना अचानक गायब झाल्याचा प्रकार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर एका युजरने या त्रुटीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कथेनुसार, यलिना ही हमजावर प्रेम करते आणि स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत राहायला जाते. ही गोष्ट तिचे वडील जमाल जलाली यांना अजिबात माहीत नसते. जेव्हा यालिना अनेक दिवस घरी परतत नाही, तेव्हा जमाल असा समज करून घेतो की त्याच्या मुलीचे अपहरण झाले आहे. नेमकं इथेच प्रेक्षकांना कथेतील मोठी उणीव जाणवली आहे.
( नक्की वाचा : Akshaye Khanna: विनोद खन्नांची दुसरी पत्नी; Dhurandhar अक्षय खन्नाबद्दल बोलताना म्हणाली, 'मी कधीच आई...' )
एका सामान्य बापासाठी देखील आपली मुलगी बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. अशा परिस्थितीत कोणताही तो आकाश-पाताळ एक करतो. जमाल जलाली हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आहेत. ते नॅशनल असेंबलीचे सदस्य आहेत. सिनेमात त्यांची ताकद, ओळख आणि वलय वारंवार दाखवण्यात आले आहे. असे असताना, आपली मुलगी गायब झाल्यावर त्यांनी केवळ मुलीचे अपहरण झाले आहे असे मानून शांत बसणे प्रेक्षकांना पटलेले नाही.
प्रशासकीय आणि राजकीय शांततेवर प्रश्नचिन्ह
एखाद्या बड्या नेत्याची मुलगी बेपत्ता झाली, तर संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. पोलीस, गुप्तहेर संस्था आणि मीडियामध्ये मोठी खळबळ उडणे स्वाभाविक असते. परंतु, धुरंधरमध्ये असे काहीही घडताना दिसत नाही. तिथे कोणताही मोठा सर्च ऑपरेशन राबवला जात नाही, की हमजापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. जमाल यांच्यासारख्या शक्तिशाली व्यक्तीने घेतलेली ही मवाळ भूमिका कथेतील एक मोठी त्रुटी मानली जात आहे.
(नक्की वाचा : Dhurandhar : रणवीरच्या गाण्याने मोडले नियम; 70 वर्षांपूर्वीची Ishq Jalakar कव्वाली कशी झाली ग्लोबल हिट? )
धुरंधर हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आणि अभिनयाच्या बाबतीत नक्कीच प्रभावी आहे. मात्र, यालिनाच्या गायब होण्याबाबतचा हा अँगल काही प्रेक्षकांना खटकला आहे. चित्रपट पाहताना तुमच्या ही चूक लक्षात आली होती का? की ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला त्यातील त्रुटीची जाणीव झाली? अशा चर्चा सध्या डिजिटल विश्वात रंगली आहे.