Disha Patani's House Targeted: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केल्यामुळे हा गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिशा पटानीच्या सिविल लाईन्स, बरेली येथील 'विला नंबर 40' बाहेर ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, वीरेंद्र चारण आणि महेंद्र सारण (डेलाणा) यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये, दिशा पटानीने हिंदू संत आणि सनातन धर्माचा अपमान केल्यामुळे हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
गुन्हेगारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ही तर फक्त एक झलक आहे. जर पुन्हा कधी दिशाने किंवा इतर कोणत्याही कलाकाराने आपल्या धर्माचा अपमान केला, तर त्यांना जिवंत सोडले जाणार नाही." ही धमकी केवळ दिशा पाटनीसाठी नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. धर्म आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी आहे, असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. मात्र, गुन्हेगारांनी केलेल्या या दाव्याची सत्यता अद्याप कोणत्याही स्वतंत्र यंत्रणेने तपासलेली नाही. या गोळीबारचे नेमके सत्य NDTV ने स्वतंत्रपणे तपास केल्यानंतरच होऊ शकेल.