Ghooskhor Pandat Controversy: नेटफ्लिक्सच्या आगामी एका चित्रपटाचा टिझर रिलीज होताच सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. मनोज बाजपेयीची मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे नाव घूसखोर पंडत असे ठेवण्यात आले आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यापासून नेटफ्लिक्सला युझर्सच्या तीव्र संतापला सामोरे जावे लागत आहे. एका भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टरची ही गोष्ट आहे, मात्र त्या पात्राच्या आडनावावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
वादाचे नेमके कारण काय?
या चित्रपटात मनोज बाजपेयी एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. निर्मात्यांनी या पात्राच्या स्वभावावरून चित्रपटाला घूसखोर पंडत असे नाव दिले. मात्र, एका विशिष्ट समाजाच्या नावाचा वापर केल्यामुळे प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर या नावाबद्दल लोक प्रचंड संताप व्यक्त करत असून नेटफ्लिक्सला चक्क बहिष्काराची धमकी दिली जात आहे. जर नाव बदलले नाही तर कोर्टात खेचू, असा इशाराही अनेक युझर्सनी दिला आहे.
( नक्की वाचा : 'धुरंधर' सोशल मीडियावर अचानक गाजायला का लागला ? ट्रेंडमध्ये आलाय Ranveer Singh चा चित्रपट, पाहा VIDEO )
सोशल मीडियावरील संतप्त प्रतिक्रिया
हा प्रोमो पाहिल्यानंतर इंटरनेटवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले की, चित्रपटाचे नाव त्वरित बदला, अन्यथा याच आठवड्यात कोर्टात याचिका दाखल केली जाईल. दुसऱ्या एका युझरने नेटफ्लिक्सला खडेबोल सुनावताना विचारले की, ब्राह्मण आणि पंडितांबद्दल आधीच द्वेष पसरलेला असताना तुम्हाला हेच नाव योग्य वाटले का? तुम्ही अशा प्रकारचे नाव इतर धर्मांबाबत वापरण्याची हिंमत केली असती का? ही केवळ क्लिक्स मिळवण्याची रणनीती आहे का? अशा शब्दांत प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. भ्रष्ट माणूस हा कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असू शकतो, मग केवळ पंडत हा शब्द का वापरला, असा प्रश्नही विचारला जात आहे.
( नक्की वाचा : Dhurandhar दिग्दर्शकाचं 'धुरंधर' घर! यामी गौतमसोबत आदित्य धरचं मुंबईतील 20 कोटींचं घर पाहिलंत का? पाहा Photos )
सनी देओल आणि अक्षय खन्ना यांचे पुनरागमन
एकीकडे मनोज बाजपेयीच्या चित्रपटावरून वाद सुरू असतानाच, नेटफ्लिक्सने सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या इक्का या चित्रपटाचा टीझरही प्रसिद्ध केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सनी देओल पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या समोर अक्षय खन्नाचे आव्हान असणार आहे. तब्बल 29 वर्षांनंतर ही जोडी एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, सध्या तरी सर्व चर्चा ही घूसखोर पंडत या नावात अडकलेल्या वादाभोवतीच फिरत आहे.