Sunjay Kapur's Property Dispute : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या घटस्फोटानंतर आता त्यांच्या मुलांनी संजय कपूर यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून दिल्ली उच्च न्यायालयात एक मोठा खटला दाखल केला आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवर त्यांची दुसरी पत्नी प्रिया सचदेव यांनी ताब्यात प्रयत्न केला, असा आरोप करिश्मा कपूर यांची मुले समायरा (20) आणि कियान (14) यांनी केला आहे. करिश्मा स्वतः त्यांच्या मुलांची कायदेशीर पालक म्हणून या प्रकरणाची बाजू मांडत आहे.
काय आहे आरोप ?
या प्रकरणात, करिश्मा कपूर-संजय कपूर यांच्या मुलांनी प्रिया सचदेव यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. या आरोपानुसार,
प्रिया यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्रात फेरफार करून ती बनावट तयार केली. त्यांनी सुरुवातीला सांगितले की कोणतेही मृत्यूपत्र नाही आणि सर्व मालमत्ता आरके फॅमिली ट्रस्टकडे आहे, पण नंतर त्यांनी 21 मार्च 2025 रोजीचे एक मृत्यूपत्र सादर केले. प्रिया यांनी त्यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली नाही आणि जाणूनबुजून अनेक गोष्टी लपवल्या.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय! )
त्यामुळे, मुलांनी न्यायालयात खालील मागण्या केल्या आहेत
- संजय कपूर यांच्या मालमत्तेचे योग्य वाटप व्हावे.
- संपत्तीचा संपूर्ण आणि अचूक हिशोब सादर केला जावा.
- प्रिया सचदेव यांना मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण करण्यापासून कायमची मनाई करण्यात यावी.
काय आहे कुटुंबातील वाद?
संजय कपूर यांचे 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. ते सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स लिमिटेड (सोना कॉम्स्टार) चे प्रमुख होते, ज्याची बाजारपेठेत किंमत 31,000 कोटी रुपये आहे. त्यांच्या निधनानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 7% नी घसरण झाली होती. या वादामुळे कपूर कुटुंबातील संबंध अधिक ताणले गेले आहेत. संजय यांची आई रानी कपूर यांनीही आरोप केला आहे की त्यांना कंपनीच्या कामांपासून आणि निर्णयांपासून दूर ठेवण्यात आले. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर यांची एकूण मालमत्ता 10,300 कोटी रुपये होती. त्यांनी त्यांच्या मुलांना 14 कोटी रुपयांचे बाँड्स दिले होते आणि दरमहा 10 लाख रुपये मिळण्याची व्यवस्था केली होती. तरीही, मुलांचा दावा आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांना मालमत्तेत मोठा वाटा देण्याचे वचन दिले होते.
( नक्की वाचा : Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनचा पारा चढला, थेट दिल्ली हायकोर्टात धाव; नक्की काय आहे प्रकरण? )
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होईल. न्यायालयाच्या निर्णयावर संजय कपूर यांच्या विशाल संपत्तीचा आणि सोना कॉम्स्टार कंपनीच्या उत्तराधिकाराचा मुद्दा अवलंबून असेल.