Kurla To Vengurla Movie Story: गावातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत कारण सगळ्यांना शहरात यायचे आहे. शहरांना घेऊन असलेले आकर्षण, प्रगती या संकल्पनेला घेऊन वाढत चाललेल्या भ्रामक कल्पना, गावांमध्ये असलेल्या आणि नसलेल्या रोजगाराची संधी असे अनेक कांगोरे या प्रश्नाशी जोडले गेलेले आहेत. गावांमध्ये अगदी सुबत्तेत राहत असलेले तरुण आज लग्न करून नालासोपारा, विरार, दिवा अशा ठिकाणी डोंगरांवर वस्त्या करून 12-15 हजाराची नोकरी करून राहत असलेले पाहिले म्हणजे या विषयाचे गांभीर्य कळते. विषय तसा गंभीर असला तरी या प्रश्नाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने, हसत खेळत अगदी संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करेल असे सादरीकरण करणारा चित्रपट 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा आज म्हणजेच 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला (Kurla To Vengurla Movie trailer) जो प्रेक्षकांच्या इतक्या पसंतीला पडला की तो ट्रेंडिंग वर आला. एकीकडे मराठी चित्रपट सृष्टीला घेऊन अनेक समस्यांच्या चर्चा होत आहेत आणि दुसरीकडे आशावादी चित्र असे आहे की आता थांबायचं नाय, एप्रिल मे 99, स्थळ यासारख्या सुंदर चित्रपटांचे नवीन दिग्दर्शक नवीन विषय नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता यात जोडला जातो आहे, कुर्ला टू वेंगुर्ला चा दिग्दर्शक, विजय कलमकर.गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट या चित्रपटातून विजय सांगणार आहे.
शिक्षणाने इंजिनियर असलेल्या विजयने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथून फिल्म एडिटिंग या विषयात पदवी घेतली आहे. आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन सोबत चार वर्षे क्रिएटिव्ह असोसिएट म्हणून काम केल्यानंतर 'मला माझं काहीतरी सांगायचं आहे' या उर्मीने विजयने या चित्रपटाची जोडणी केली. विजय चे वैशिष्ट्य म्हणजे एका पायाला पोलिओ असून सुद्धा आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत त्याने आयुष्यात हा टप्पा गाठला आहे.
पुण्यातील रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिवल आणि गोवा मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचे सादरीकरण झाल्यानंतर चित्रपट प्रेक्षकांना इतका पसंतीस पडला की संपूर्ण थिएटर उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटतात विजय चे आणि त्याची निर्मिती संस्था, 'सिने कथा किर्तन' चे अभिनंदन करत होते.
गेले 30 वर्षे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिल्ममेकिंग वर्कशॉप घेऊन ग्रामीण भागातील विषय आणि तिथले कलाकार यांना मेनस्ट्रीमध्ये आणणारे, स्पंदन परिवार सिनेमा मूव्हमेंट या चळवळीचे संस्थापक अमरजीत आमले यांनी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे.
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा विजय कलमकर या नवीन ऊर्जेच्या दिग्दर्शकाचा ‘कुर्ला टू वेंगुर्ला' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आवर्जून पहावा असा आहे.