बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा वाद सुरु आहे. छत्रपती संभाजी राजेंवरील चित्रपटावरुन टीका सुरु असतानाच मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेता किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी, प्रतिभावान अभिनेते अशी किरण माने यांची ओळख आहे. आपल्या अभिनयाइतकेच किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राजकारण, समाजकारण तसेच मराठी चित्रपट जगतातील घडामोडींवर ते परखडपणे मत व्यक्त करतात. सध्या अभिनेते किरण माने यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यामध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत.
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
'छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले... असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे.
स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची खूनही आहे. त्यामुळे गोष्टीरुपात आलं की रंजकता येते आणि रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो, असंही राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले. मु.पो. मनोरंजन या पेजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये त्यांनी हा देवा केला असून यावरुनच किरण मानेंनी संताप व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : 6 वर्षांपूर्वी केली शेजारच्या महिलेची हत्या, जामिनावर बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्यासह सासूला संपवलं! )
असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणार्या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले. अरे, 'लाच' दिली होती का नव्हती हे दूरच... पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का??? कडेकोट बंदोबस्तात तुरूंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते इव्हिएम घोटाळ्यानं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय? अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.