53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. हा चित्रपट आजही अनेकांच्या पसंतीचा चित्रपट आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

बॉलिवूडच्या इतिहासात एक असा चित्रपट झाला ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील  तीन कलाकारांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. कोणत्याही कलाकारासाठी एक चित्रपट असा असतो जो त्यांची करीअरची गाडी प्रगती पथावर आणून ठेवतो. या चित्रपटातील संवाद इतके जबरदस्त होते की ते आजही अनेकांच्या तोंडी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.या चित्रपटाचे नाव आहे 'मेरे अपने' हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. हा चित्रपट आजही अनेकांच्या पसंतीचा चित्रपट आहे. 

खलनायक झाले नायक

या चित्रपटात प्रमुख भूमिका होती ती शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांची. गंमतीची गोष्ट अशी आहे की, या चित्रपटातील दोन्ही नायक यापूर्वी खलनायकाच्या भूमिकेत दिसायचे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन्ही हिरोंना अॅक्शन हिरो म्हणून काम करायची संधी मिळाली होती. हा चित्रपट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असून हा आपल्या कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरेल याची शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना या दोघांना खात्री होती. या चित्रपटामुळे दोघांची मोठ्या पडद्यावरील प्रतिमा बदलण्यास खूप मदत झाली. याच चित्रपटामध्ये एक डायलॉग होता, "श्याम आए तो कहना उससे मिलने छेनू आया था." हा जबरदस्त हिट झाला होता. हा संवाद आजही अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. 

अभिनेत्रीचा मृत्यू

या चित्रपटात मीना कुमारी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. चित्रपट त्यांच्याभोवतीच फिरताना दिसतो. या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध, विधवा महिलेची भूमिका साकारली होती. ही विधवा महिला अनाथ मुलांना आसरा देत असते आणि ती हळूहळू प्रसिद्ध होत जाते असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्याच्या काही दिवसांतच मीना कुमारी यांचा मृत्यू झाला होता.  31 मार्च 1972 रोजी मीना कुमारी यांचे निधन झाले.