Mohammed Rafi's Son Slams Lata Mangeshkar and Asha Bhosle : दिग्गज गायक मोहम्मद रफींचे पुत्र शाहिद रफी यांनी, लता मंगेशकर आणि आशा भोसले या दिग्गज गायिका बहिणींवर गंभीर आरोप केला आहे. या दोघींच्या मत्सर आणि असुरक्षिततेमुळे रफींचे करिअर खराब झाले, असा थेट आरोप शहिद रफी यांनी केला. लता मंगेशकर यांनी तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा सन्मान जिंकण्यापासूनही माझ्या वडिलांना रोखले, असा दावा त्यांनी केलाय. या आरोपांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
शाहिद रफी यांनी पत्रकार विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत हे गंभीर आरोप केले आहेत. शाहिद म्हणाले की, त्यांच्या वडिलांना त्यांच्या काळातील पुरुष गायकांबद्दल काहीच समस्या नव्हती, पण महिलांच्या बाबतीत मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती.
ते या मुलाखतीमध्ये म्हणाले, 'रफी साहेब त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत, याचा त्यांना मत्सर होता. सगळ्यांनी आपल्या खाली असावं अशी त्यांची इच्छा होती. लोक त्यांना नंबर वन म्हणत होते आणि हे त्यांना आवडत नव्हते. मी कुठेतरी ऐकले होते की त्या 9 वर्षे घरी बसून दु:खी होत्या. प्लीज! 1970 च्या दशकात त्यांनी गायलेले कोणतेही गाणे ऐका." शाहिद म्हणाले की, त्यांच्या वडिलांनी घेतलेला हा छोटा ब्रेक स्वतःहून घेतला होता. काही वर्षांनी ते पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परतले.
( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )
आशा भोसलेंना उत्तर
आशा भोसले यांनी 'रफीमध्ये रेंज नाही' असे कथित विधान केले होते, त्याला उत्तर देताना शाहिद पुढे म्हणाले, "हे त्यांच्यासमोर सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही आणि लताजींच्या निधनापूर्वीच मी त्यांना हे सांगितले होते. त्यांनी दावा केला होता की, त्यांचे करिअर उतरणीला लागले होता आणि त्यांनी त्यांची माफी मागितली होती. पण त्यांनी असे कधीही म्हटले नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की लताजींनी हे सांगितले होते आणि दोन लोक माझ्या वडिलांकडे आले आणि त्यांनी माफी मागितली. अनेक नव्या गायिका येत होत्या, ज्यात त्यांची स्वतःची बहीणही होती. आणि त्यामुळे त्या असुरक्षित होत्या. मला सांगा, उतरणीला लागण्याचा धोका कोणावर होता?"
'आशा भोसले म्हाताऱ्या झाल्या आहेत'
शाहिद म्हणाले की, 1960 च्या दशकात त्यांचे वडील त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते. "त्या दिवसांत त्यांच्याकडे आमच्यासाठीही वेळ नव्हता. माझ्या वडिलांबद्दल कोणी वाईट बोललेले मी कधीच सहन करणार नाही. मी शांत बसणार नाही, मग कोणीही असो. माझे वडील माझे वडील होते आणि मला माहीत होतं की त्यांचे काय विचार होते." ते पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्सकडून सन्मान मिळणार होता, तेव्हा लता मंगेशकर यांनी त्यात 'हस्तक्षेप' केला होता.
आशा भोसले यांच्या कथित 'रफीमध्ये रेंजची कमतरता' या वक्तव्या पुन्हा उल्लेख करत शाहिद त्यांनी त्यांना थेट सांगितले, "तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती आहात. थोडी लाज बाळगा. या वयात तरी नाही. हे लक्षात ठेवा! मी त्यांना थेट सांगत आहे. वरती देव बसला आहे. माझ्या वडिलांबद्दल कोणी काही बोलले तर ते माझ्याकडून सहन होत नाही." पुन्हा आशा यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, "तुम्ही म्हाताऱ्या झाला आहात, आता स्वतःबद्दल बोला."