मराठी नाटक, मराठी सिनेमा किंवा हिंदी चित्रपट या सर्व क्षेत्रात नाना पाटेकरनं स्वत:चा ठसा उमटवला आहे. अभियनातील वैविध्यासह प्रत्यक्ष नाना त्याच्या रोखठोक वक्तव्याबद्दल प्रसिद्ध असतो. पण, 'लल्लनटॉप' या पोर्टलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नानानं त्याच्या मोठ्या मुलाच्या आठवणी सांगितल्या. दुर्वास ऋषींवरुन त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. फक्त अडीच वर्षाचा असताना त्याचं निधन झालं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला नाना?
नाना या मुलाखतीमध्ये म्हणाला की, 'माझा मोठा मुलगा दुर्वास जन्मापासूनच आजारी होता. त्याची तब्येत नाजूक होती. त्याच्या एका डोळ्यात दोष होता. तो दिसत नव्हता. त्याला पाहिल्यावर मला प्रचंड तिरस्कार वाटली. माझ्या मनात लोकं नानाचा मुलगा कसा आहे? असं म्हणतील हा विचार होता. त्याला कसं वाटत असेल, याचा मी विचारच केला नाही. मी फक्त माझ्या मुलाबद्दल लोकं काय म्हणतील याचा विचार केला. आम्हाला त्याचा अडीच वर्षच सहवास मिळाला. पण, आता काय करु शकतो. आयुष्यात काही गोष्टी घडत असतात.'
( नक्की वाचा : 53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू )
वेलकम या गाजलेल्या हिंदी सिनेमात नाना पाटेकरची मुख्य भूमिका होती. आता सिनेमाच्या तिसऱ्या भागाचं शूटिंग सुरु आहे. पण, नानाचा तिसऱ्या भागात रोल नाही. त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नाना चर्चेत आला होता. 'मी आता या सिनेमाचा भाग नाही. आम्ही आता जुने झालो आहोत, असा ते विचार करत असतील,' असं नानानं सांगितलं.
वेलकम 3 मध्ये अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटणी, परेश रावल, तुषार कपूर आणि रविना टंडन यांची मुख्य भूमिका आहे. संजय दत्त देखील या सिनेमात होता. पण काही दिवसांपूर्वीच त्यानं हा सिनेमा सोडल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.