Girija Oak: अभिनेत्री गिरीजा ओक हिचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली. मात्र, या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीची दुसरी बाजू खूपच भयानक आणि त्रासदायक आहे. एका ताज्या मुलाखतीत गिरीजा हिने तिला आलेल्या अश्लील मेसेजचा आणि एआय मॉर्फ्ड इमेजेसचा खुलासा केला आहे.
"एक तास घालवण्याची किंमत काय?"
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गिरीजा हिचे एका मुलाखतीतील निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल झाले. सोशल मीडियावर अनेकांनी तिला 'इंडियाज सिडनी स्वीनी' म्हणत 'न्यू नॅशनल क्रश' घोषित केले. मात्र, ही प्रसिद्धी गिरीजा हिच्यासाठी फारशी सुखद ठरली नाही.
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा हिने या अनुभवावर मन मोकळं केलं. गिरीजा म्हणते, "मला कुणी विचारलं की काही बदललं का? तर मी म्हणाले, नाही, मला अजून कोणतेही कामाचे जास्त ऑफर्स आले नाहीत."
( नक्की वाचा : VIDEO : 'नीली साडी' ट्रेंडवर गिरीजा ओकचं कळकळीचं आवाहन, म्हणाली, 'माझ्या 12 वर्षांच्या मुलाचा विचार करा...' )
37 वर्षीय गिरीजा हिने या अचानक आलेल्या प्रसिद्धीची काळी बाजू उघड केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुरुषांकडून अनेक अश्लील आणि त्रासदायक मेसेज येत असल्याचं तिनं सांगितलं. याबद्दल बोलताना ती म्हणाली, "एकाने लिहिलं की, 'मी तुझ्यासाठी काहीही करू शकेन, मला एक संधी दे.' तर एका व्यक्तीने तर माझा रेट (Price) विचारला— 'एक घंटा बिताने की किमत क्या है?' (What is the price to spend an hour with you?)."
असे अनेक मेसेज येत असल्याचे तिने सांगितले. गिरीजा हिने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, "हेच लोक मला प्रत्यक्ष आयुष्यात भेटले तर ते वरती मान करून माझ्याकडे पाहणार देखील नाहीत. पण, पडद्यामागे लोक काहीही बोलतात. समोर मात्र आदराने आणि प्रेमाने बोलतात. हे खूप विचित्र जग आहे. या आभासी (Virtual) जागेला आपण किती गांभीर्याने घ्यावे, यावर मोठे वादंग होऊ शकते."
( नक्की वाचा : Dharmendra : 'यमला पगला दिवाना' माझा चित्रपट होता, धर्मेंद्र यांचा फोन आला आणि...सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा )
एआय मॉर्फ्ड अश्लील फोटोंवरही व्यक्त केली नाराजी
यापूर्वी, गिरीजाचे एआय मॉर्फ्ड (AI-Morphed) केलेले अश्लील फोटो व्हायरल झाले होते. तेव्हाही तिने इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. हे फोटो तिच्या सोयीपलीकडे जाऊन लैंगिकरित्या आणि वस्तू म्हणून वापरले जात असल्याबद्दल तिने तीव्र नापसंती व्यक्त केली होती.
विशेषतः तिचा 12 वर्षांचा मुलगा असल्याने, या गोष्टीचा तिला अधिक त्रास होतो, असे तिने सांगितले. "जेव्हा एखादी गोष्ट व्हायरल होते, ट्रेंडिंगमध्ये येते, तेव्हा अशा प्रकारच्या इमेजेस बनवल्या जातात आणि प्रसारित केल्या जातात, जोपर्यंत लोक तुमच्या पोस्टवर क्लिक करत राहतात, पुरेसे लाइक्स, इंटरॅक्शन्स आणि व्ह्यूज मिळत राहतात. यातच त्यांचा उद्देश पूर्ण होतो. हा खेळ कसा खेळला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे," असे गिरीजा हिने स्पष्ट केले होते.