रेवती हिंगवे, प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. आज (11 एप्रिल) म्हणजेच महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटावरील आक्षेपाबाबत दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले दिग्दर्शक?
फुले चित्रपटाला सेन्सॉर बॉर्डन U सर्टिफिकेट दिलं आहे. सेन्सॉर बोर्डामे जे बदल सांगितले होते ते करण्यात आले आहेत. त्यांनी सीन कट करायला सांगितला नव्हता. काही बदल सांगितले होते, ते आम्ही केले असल्याचं महादेवन यांनी सांगितलं.
या चित्रपटाबाबत जो विचार केला जातोय तो गैरसमज आहे. कोणत्याही सिनेमाचा ट्रेलर पाहून तो कसा आहे हे ठरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ब्राह्मण समाज किती चुकीचा आहे हे त्यांना हा सिनेमा पाहिल्यावर कळेल. मी स्वतः एक ब्राह्मण आणि मला वाटते की माझ्या एवढा स्ट्रॉंग ब्राह्मण कुणीच नाही, असा दावाही महादेवन यांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पहिल्या शाळेला ब्राह्मणांनी जागा दिली होती. ब्राह्मण समाज आणि ज्योतिबा फुले यांची लव्ह स्टोरी आहे हेट स्टोरी नाही, असं स्पष्टीकरण महादेवन यांनी केलं.
( नक्की वाचा : Phule Movie : ब्राम्हण महासंघाचा आक्षेप, महात्मा फुलेंच्या जयंती दिनी होणारं चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर )
काय आहे आक्षेप?
ब्राम्हण महासंघाच्या वतीनं या फुले चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे. हा प्रकार दाखवण्यास विरोध नाही. मात्र फुलेंच्या शाळेसाठी मदत करणारे ब्राम्हणच होते. ते ट्रेलरमध्ये का दाखवण्यात आले नाही. असा सवाल ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीयवाद पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत आनंद दवे यांनी या सिनेमावर आक्षेप घेतलाय.
या चित्रपटात यामध्ये महात्मा ज्योतिबांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा राव यांनी साकारली आहे. प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा, अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे यांनी फुले चित्रपटाची निर्मिती केली आहे.