अभिनेत्री प्रीती झिंटासोबत (Preity Zinta ) ऐकेकाळी रिलेशनशिपमध्ये राहिलेले उद्योजक नेस वाडिया (Ness Wadia) सध्या चर्चेत आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल टीम मालकांच्या बैठकीत त्यांचा कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) मालक शाहरुख खानसोबत वाद झाला. नेस वाडिया वादात सापडण्याचं हे पहिलंच प्रकरण नाही.
ऐकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले वाडिया आणि प्रीती यांचं नातं तुटल्यानंतरही दोघांमधील संबंध चांगलेच कडवट झाले होते. प्रीतीबरोबचं नातं मोडल्यानंतर अभिनेत्रीनं वाडिया यांच्यावर धमकावणे, घाबरवणे आणि गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. तसंच हे या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रीती-वाडिया लव्ह स्टोरी
अभिनेत्री प्रीती झिंटानं 2005 साली नेस वाडियासोबतचं नातं कन्फर्म केलं होतं. त्यावेळी प्रीती आणि नेस वाडिया पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा हात पकडून ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांच्या लग्नात दिसले होते. हे जोडपं ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात एकत्र सहभागी झालं होतं. त्याचबरोबर प्रीतीच्या वाढदिवशी वाडियानं एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी देखील या दोघांचं नातं सर्वांसमोर आलं. 2008 साली नेस वाडिया आयपीएल टीम पंजाब किंग्ज इलेव्हनचे सहमालक बनले. त्यामुळे हे दोघं बिझनेस पार्टनरही झाले.
कोर्टात गेलं प्रकरण
2008 साली बिझनेस पार्टनर झाल्यानंतर वर्षभरातच या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. याबाबतच्या रिपोर्टनुसार, नेस वाडियानं एका पार्टीत प्रीतीला थोबाडीत मारली होती. 2013 साली एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रीतीनं वाडियाबरोबरचं नातं तुटल्याचं मान्य केलं होतं.
( नक्की वाचा : सलमान खानच्या घरावर गोळी चालवणारा 'मामा' कोण? मुंबई पोलिसांसमोर नवी डोकेदुखी )
त्यानंतर पुढच्या वर्षी दोघांमध्ये मोठा वाद झाला. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. प्रीतीनं नेस वाडियाविरुद्ध 2014 साली एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामध्ये तिनं घाबरवणे, धमकावणे, गैरवर्तन करणे, तसंच छेडछाड करण्याचा आरोप लावला होता.