सईबाई चटर्जी, प्रतिनिधी
Raja Shivaji Movie Review: रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' हा चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी चित्रपटगृहा प्रदर्शित झाला आहे. 'तान्हाजी' किंवा 'छावा' सारख्या सिनेमांनी इतिहासातील काही विशेष प्रकरणांवर लक्ष केंद्रित केलं होतं, पण रितेशचा हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि स्वराज्याच्या पायाभरणीचा काळ पडद्यावर मांडतो. हा सिनेमा नक्की कसा झालाय? रितेशने महाराजांची भूमिका कशी निभावली आहे? जाणून घेऊया या सविस्तर रिव्ह्यूमध्ये.
ऐतिहासिक भव्यता आणि वेगळी मांडणी
हा सिनेमा केवळ युद्ध आणि ओरडण्यावर भर देणारा नाही. 1629 पासून ते 1659 मधील अफजल खान वधापर्यंतचा काळ यात गुंफला आहे. विशेष म्हणजे, यात शिवाजी महाराजांना केवळ एक 'सुपरहिरो' न दाखवता, एक संवेदनशील मुलगा, पती, पिता आणि प्रजेचा कैवारी म्हणून दाखवण्यात रितेशला यश आलंय. सिनेमात रक्ताचा सडा आणि युद्धाचे प्रसंग आहेत, पण त्यात एक प्रकारचा संयम पाळण्यात आलाय जो प्रेक्षकांना विचार करायला लावतो.
तगडी स्टारकास्ट आणि अभिनयाची जुगलबंदी
रितेश देशमुखने शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय संयत आणि प्रभावीपणे साकारली आहे. त्याच्या नजरेतील तीव्रता आणि संवादातील जरब मनाला भिडते. त्याला साथ मिळाली आहे ती म्हणजे संजय दत्तची. अफजल खानच्या भूमिकेत संजय दत्तने एक प्रचंड आणि भीतीदायक व्यक्तिमत्व उभं केलंय. दोघांमधील शेवटचा सामना हा सिनेमाचा सर्वात मोठा हायलाईट आहे.
( नक्की वाचा : Raja Shivaji: रितेशच्या चित्रपटात महाराजांची युद्धनीती चुकीची दाखवली? 'वाघनखांच्या' प्रसंगाचा इतिहास काय आहे? )
अभिषेक बच्चनने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका चोख बजावली आहे. याशिवाय विद्या बालन (खदिजा सुलताना), भाग्यश्री (राजमाता जिजाऊ) आणि जेनेलिया देशमुख (सईबाई) यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात महिला पात्रांना केवळ नावापुरतं न ठेवता त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय.
सिनेमाची तांत्रिक बाजू आणि दिग्दर्शन
दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुखने प्रेक्षकांना 17 व्या शतकात नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून स्वराज्याचा काळ अतिशय सुंदर पद्धतीने टिपला आहे. दृश्यांची मांडणी आणि प्रकाशयोजना डोळ्यांना सुखावणारी आहे. सिनेमाचा शेवटचा भाग, जिथे अफजल खान आणि महाराज यांची भेट ठरते, तो भाग अतिशय उत्कंठावर्धक झाला आहे.
काही उणिवा आणि संवाद
सिनेमा जरी भव्य असला तरी त्याचा वेग काही ठिकाणी मंदावतो. 3 तासांपेक्षा जास्त वेळ असलेला हा सिनेमा कधीकधी थोडा लांबल्यासारखा वाटतो. संवादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही ठिकाणी ते अधिक टोकदार असायला हवे होते. पण एकूणच, रितेशने ऐतिहासिक तथ्यांशी फारशी छेडछाड न करता एक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
कसा आहे एकूण अनुभव?
'राजा शिवाजी' हा सिनेमा केवळ मनोरंजन नाही, तर तो एका महान योद्ध्याचा सन्मान आहे. जर तुम्हाला इतिहासाची ओढ असेल आणि महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा प्रवास पुन्हा एकदा नव्या नजरेतून अनुभवायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच पाहावा असा आहे. रितेश देशमुखचा हा प्रयत्न कौतुकास्पद असून त्याने एका मोठ्या कॅनव्हासवर मराठ्यांचा इतिहास मांडला आहे.