Rekha Birthday : बॉलिवूडची 'उमराव जान' म्हणजेच रेखा 10 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांची होत आहे. रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्य आणि कथा नेहमी चर्चेत असतात. दक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन आणि पुष्पावल्ली यांची मुलगी असलेल्या रेखाच्या कपाळावर नेहमी गंध असतं. सोशल माडियाचा काळ नव्हता त्यावेळी चित्रपट मासिकं हा कलाकारांच्या आयुष्याबद्दल माहिती देणारा एकमेव स्रोत होता. बॉलिवूड कलाकारांबद्दल सर्वसामान्य फॅन्सना अनेक प्रश्न पडत. सामान्य नागरिकांप्रमाणेच राष्ट्रपतीही त्याला अपवाद नव्हते. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या मनातही रेखाबद्दल एक प्रश्न होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेखा सिंदूर का लावते?
रेखावर लिहिलण्यात आलेल्या 'रेखा द अनडटोल्ड स्टोरी' या पुस्तकामध्ये हा किस्सा लिहिण्यात आला आहे. 1981 साली 'उमराव जान' या चित्रपटासाठी रेखाला सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तो पुरस्कार घेण्यासाठी रेखा स्टेजवर पोहोचली. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी अभिनेत्रीला तो प्रश्न विचारला. त्यावेळी राष्ट्रपतींसह संपूर्ण देशाच्या मनात तो प्रश्न होता.
'तू केसांमध्ये सिंदूर का लावतेस?' असा प्रश्न तत्कालीन राष्ट्रपती रेड्डी यांनी रेखाला विचारला. त्यावर 'मी ज्या शहरातून येते तिथं केसांमध्ये सिंदूर लावणं ही सामान्य बाब आहे. फॅशन आहे,' असं उत्तर रेखानं दिलं.
रेखाचे चित्रपट
रेखानं नागिन (1976), मुकद्दर का सिकंदर (1978), मिस्टर नटवरलाल (1979), खूबसूरत (1980), उमराव जान (1981), खून भरी मांग (1988) या गाजलेल्या चित्रपटामधून काम केलं आहे. तिनं 1996 साली प्रदर्शित झालेल्या खिलाड़ियों का खिलाड़ी चित्रपटात नकारात्मक भूमिका केली होती. त्यानंतर वयोमानानुसार ती क्रिश (2006) या चित्रपटात आजी बनली.
( नक्की वाचा : ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज आणि डिव्होर्स! समंथावरील खळबळजनक आरोपानंतर मंत्री म्हणाल्या.. )
रेखाला काय करायचं होतं?
छोट्या पडद्यावरील सिमी ग्रेवाल शो मध्ये रेखाला 'भानूरेखाला काय करायचं होतं?' हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 'मला अभिनेत्री अजिबात व्हायचं नव्हतं. मला लग्न करुन संसार करायचा होता.' असं उत्तर रेखानं दिलं होतं.
'मी मनातली गोष्ट मोकळेपणे बोलू शकत नाही', असं रेखानं अनेकदा सांगितलं आहे. मनातले विचार मोकळेपणे मांडता येत नाहीत, असं रेखानं सांगितलं आहे. रेखा या वयातही सदाबहार आहे. आयफा पुरस्कार 2024 मध्ये सुमारे 25 मिनिटांचा नॉनस्टॉप परफॉर्मन्स तिनं केला होता.