Shah Rukh Khan trolled for Alpha movie: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सच्या निशाण्यावर आला आहे. आलिया भट्टच्या आगामी बहुचर्चित 'अल्फा' या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर शाहरुखने तिचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, आलियाची ही स्तुती करणे किंग खानला चांगलेच महागात पडले आहे.
सोशल मीडियावरील युजर्सनी शाहरुखला जुन्या गोष्टींची आठवण करून देत थेट ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका मोठ्या आणि गाजलेल्या सिनेमाच्या वेळी शाहरुखने बाळगलेले मौन आणि आता आलियाच्या सिनेमासाठी दाखवलेली तत्परता यावरून नेटीझन्सनी त्याला थेट 'धुरंधर च्या वेळी कुठे होतास?' असा रोकडा सवाल विचारला आहे.
अल्फाचा टीझर आणि प्रेक्षकांचा संताप
आलिया भट्ट, बॉबी देओल आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'अल्फा' या सिनेमाचा टीझर 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आलियाच्या चाहत्यांना हा टीझर आवडला असला, तरी खऱ्या सिनेमा रसिकांना तो फारसा भावलेला नाही. या टीझरमधील अनेक सीन्स हे इतर हॉलिवूड किंवा परदेशी सिनेमांमधून जसेच्या तसे कॉपी-पेस्ट केल्यासारखे वाटत असल्याचा आरोप नेटीझन्स करत आहेत.
हा वाद सुरू असतानाच जेव्हा बॉलिवूडचे मोठे स्टार्स या सिनेमाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आले, तेव्हा लोकांना ते अजिबात आवडले नाही आणि त्यातूनच शाहरुख खान युजर्सच्या रडारवर आला.
शाहरुख खानने नक्की काय म्हटले होते?
शाहरुख खानने 'अल्फा'चा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आलिया भट्ट आणि टीमचे कौतुक केले होते. शाहरुखने लिहिले होते की, वेल डन आलिया, इतकी वर्षे प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता थेट हाडे मोडण्यापर्यंत तुझी प्रगती झाली आहे. अल्फा सिनेमाने सगळ्यांची मने जितावीत आणि सिक्वेलसाठी काही व्हिलन जिवंत राहावेत हीच इच्छा. बॉबी देओल जेव्हा बॅड बॉय बनतो, तेव्हा तो जास्त चांगला वाटतो, असे म्हणत त्याने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या.
Well done Alia, in years from breaking hearts and now to breaking bones your skill set keeps expanding.
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 10, 2026
May Alpha win hearts and still leave some villains standing for the sequel.
Go get them Sigma girl! Lord Bobby….you are so good when you are bad!!! Big hug. And all the best… https://t.co/ffIgkKWsSu
शाहरुखचे ट्विट पाहताच नेटीझन्स भडकले
शाहरुख खानने हा पॅराग्राफ लिहून आलियाचे कौतुक करताच सोशल मीडिया युजर्सचा पारा चढला. लोकांनी कमेंट्स करत शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, सर, काही महिन्यांपूर्वीच 'धुरंधर' सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात? दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले की, धुरंधर सिनेमासाठी तुमच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही आणि या कार्टून सिनेमासाठी तुम्ही अख्खा पॅराग्राफ लिहून टाकला. स्पाय युनिव्हर्समध्ये फक्त नवीन चेहरे आणलेत, पण कथा आणि ओपनिंग सीन्स तेच जुने कॉपी केलेले आहेत, अशी टीकाही अनेकांनी केली.
इतर सिनेमांमधील सीन्स कॉपी केल्याचा आरोप
सोशल मीडियावर लोकांनी 'अल्फा'च्या टीझरची तुलना हॉलिवूडच्या कोलम्बियाना आणि केट या सिनेमांशी करायला सुरुवात केली आहे. हे सगळे सिनेमे एकत्र करून मिक्सरमध्ये वाटले की अल्फा तयार होतो, असा टोला युजर्स लगावत आहेत. प्रत्येक मोठा स्टार या सिनेमाचे प्रमोशन का करत आहे, असा प्रश्नही सामान्य प्रेक्षकांना पडला आहे.
एका युझरने तर रणवीर सिंहचा फोटो पोस्ट करत, मी सुद्धा एक स्पाय आहे, माझे पण थोडे कौतुक करा, अशी मजेशीर कमेंट केली आहे. एकूणच, आलिया भट्टला सपोर्ट करणे सध्या शाहरुख खानला चांगलेच जड जात असल्याचे चित्र दिसत आहे.