मेहबूब जमादार, रायगड: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांची मुलगी सुहाना हिने अलिबाग जवळील थळ येथे जून 2023 मध्ये केलेल्या जमिनीच्या व्यवहारास हरकत आली असल्याने सदर जमिनी मिळकत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये अलिबाग तहसील कार्यालया कडील भोंगळ कारभार देखील समोर आला असून सदरची जमीन शासनजमा करण्यात यावी अशी मागणी ॲड. विवेकानंद दत्तात्रेय ठाकूर यांनी केली आहे.
सुहाना खानने जून 2023 मध्ये अलिबाग नजिकच्या थळ येथील समुद्र किनाऱ्यालगतची एक जमीन खरेदी करण्याचा व्यवहार सुमारे १२ कोटी ९० लाख रुपयांना केला आहे. सदर जमिनीचा साठेकरार अलिबाग येथील उपनिबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करण्यात आला. सदर जमीन ही तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयाने १९६८ मध्ये भाडेपट्ट्याने नारायण विश्वनाथ खोटे यांना केवळ झाडे लागवडीसाठी दिली होती, सदर जमिनीवर बांधकाम करण्याचे नव्हते.
नारायण खोटे यांचे निधन झाल्यानंतर सदर जमीन त्यांचे वारसदार अंजली खोटे, रेखा खोटे व प्रिया खोटे यांच्या नावावर झाली. त्यांच्याकडून ही जमीन सुहाना शाहरुख खानने खरेदी करण्याचे ठरविले होते व तसा विक्रीचा साठेकरार नोंदणी करण्यात आला आहे. शासनाकडून भाडे पट्ट्याने झाडे लागवडीसाठी ही जमीन मिळालेली असल्याने जमिनीच्या विक्रीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लागणाऱ्या परवानगीसाठी खोटे कुटुंबांनी अर्ज केला आहे.
सदर अर्जाच्या कार्यवाही प्रक्रियेमध्ये अलिबाग तहसील कार्यालयाने संबंधित महसूल मंडळ निरीक्षक यांच्याकरवी जमिनीची वस्तुस्थिती अहवाल मागितला होता. त्यावेळी सदर जमिनीवर बांधकाम नसल्याचा अहवाल तत्कालीन मंडल निरीक्षक यांनी देऊन परवानगी देण्यासाठी सकारात्मक अहवाल तयार केला. तथापि साठेकरार नोंदणी करताना या जमिनीमध्ये तीन बांधकामे असून त्यांना ग्रामपंचायतीने घर नंबर दिलेले कागदपत्र जोडण्यात आल्याने अलिबाग तहसील कार्यालया कडून केलेली चौकशी सकृत दर्शनी खोटी असल्याचे उघड झाले आहे.
तसेच सदर मिळकत सीआरझेड मध्ये येत असताना या ठिकाणी बांधकामे करण्यात आली, याकडे अलिबाग तहसील कार्यालयाने अर्थपूर्ण कानाडोळा केल्याची चर्चा अलिबाग परिसरात सुरू आहे.जमीन व्यवहार व त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व अलिबाग तहसील कार्यालय यांच्याकडील कारवाई देखील संशयास्पद असल्याने शासनाकडून नारायण खोटे यांना मिळालेली जमीन ही शर्तभंग झाल्याने सदर जमीन शासनजमा करावी असा अर्ज ॲड. ठाकूर यांनी कोकण आयुक्तांकडे केला आहे.