Hashtag Tadev Lagnam Movie : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) या फ्रेश जोडीचा नवाकोरा सिनेमा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' 20 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुभम फिल्म प्रोडक्शन हा सिनेमा आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आणि सिनेमाच्या प्रदर्शनाचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आजच्या काळातील 'हॅशटॅग' ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा सिनेमा आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे तर शेखर विठ्ठल मते हे निर्माते आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आहे तर सुबोधच्या मागे ऑफिस लुकमध्ये बसलेली नवरी दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असावा.
सिनेमामध्ये लग्नकार्यातील धमाल तर आहेच. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही दिसणार आहेत तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही.
(नक्की वाचा: Punha Ekda Saade Maade Teen: पुन्हा एकदा साडे माडे तीन सिनेमाचा पार पडला मुहूर्त, रातोरात स्टार झालेली अभिनेत्री झळकणार?)
चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, "आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपण पाहण्यासाठी प्रेक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”
(नक्की वाचा: सोशल मीडियावर Bigg Boss Boycott ट्रेंड; आर्याला घराबाहेर काढल्यामुळे चाहत्यांमध्ये संताप!)