Sulakshana Pandit Death : हिंदी चित्रपट आणि संगीत जगतासाठी एक अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या मधुर आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, अशी माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
सुलक्षणा पंडित यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मात्र, अभिनय आणि पार्श्वगायनात त्यांनी जी अमिट छाप सोडली, ती आजही लोकांच्या आठवणीत कायम आहे.
घराण्यातील वारसा आणि बालपणीचा प्रवास
सुलक्षणा पंडित यांचा जन्म एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबात 1954 मध्ये झाला होता. महान शास्त्रीय गायक पंडित जसराज हे त्यांचे सख्खे काका होते. त्यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत. त्यांचे भाऊ जतीन-ललित या नावाने संगीतकार जोडी म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत.
सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षांपासून संगीताची साधना करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1967 मध्ये पार्श्वगायनात (Play-back Singing) पदार्पण केले. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'संकल्प' (Sankalp) चित्रपटातील 'तू ही सागर है तू ही किनारा' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट फिमेल प्लेबॅक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
( नक्की वाचा : Satish Shah Death: हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा )
अभिनयातही कमावले मोठे नाव
केवळ गायिकीच नव्हे, तर अभिनयाच्या क्षेत्रातही त्यांनी 1970 ते 1980 च्या दशकात सक्रिय योगदान दिले. त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत ‘उलझन' (Uljhan - 1975), ‘संकोच' (Sankoch - 1976) यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले.
त्यांचा अभिनय आणि गायिकीचा प्रवास खूप समृद्ध राहिला, पण नंतरच्या काळात त्यांना व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जितेंद्र यांची घ्यावी लागली मदत
सुलक्षणा पंडित यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेक वर्षे काम न मिळाल्याने आणि त्यांच्या अपार्टमेंटची दुरूस्ती झाली नसल्याने ते विकले गेले नाही. यामुळे त्यांना त्यांची बहीण विजेता यांच्यासोबत राहण्यास जावे लागले.
2005 मध्ये त्यांचे पूर्व सह-अभिनेते जितेंद्र यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी त्यांच्या मेहुण्याला सुलक्षणा यांचे अपार्टमेंट विकत घेण्यास राजी केले.या विक्रीतून मिळालेल्या पैशातून सुलक्षणा यांनी 3 फ्लॅट्स खरेदी केले आणि कर्जही फेडले. या घटनेमुळे सुलक्षणा यांना एक नवी उमेद मिळाली आणि त्या सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या.
जन्मभर अविवाहित
सुलक्षणा यांनी वैयक्तिक आयुष्यात कधीही लग्न केले नाही आणि त्या आयुष्यभर एकट्या राहिल्या. अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबतची त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा अनेक दिवस होती. याशिवाय, त्यांना अनेक आरोग्यविषयक गुंतागुंत आणि आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला होता.
सुलक्षणा पंडित यांच्या जाण्याने चित्रपट आणि संगीत जगताने एक युगाची साक्षीदार असलेला 'आवाज' आपण गमावला आहे. त्यांची पडद्यावरील उपस्थिती आणि संवेदनशील कला रसिकांच्या मनात कायम जिवंत राहील.