Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतप्ततेची भावना आहे. काश्मीरमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरु झाल्यानंतर लगेच हा हल्ला झाला. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक जण काश्मीरचं बुकींग रद्द करत आहेत. त्याचवेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गद अभिनेत्यानं पुढील सुट्टी काश्मीरमध्ये घालवणार असल्याची घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) काश्मीरमधील फिरायला जाणार असून तेथील पर्यटनाला चालना देणार असल्याची घोषणा केली आहे. लता मंगेशकर पुरस्कार कार्यक्रम 2025 मध्ये त्यानं हे मत मांडलं. या कार्यक्रमात सुनील शेट्टी म्हणाला की, 'काश्मीर हे नेहमीच भारताचे अविभाज्य अंग आहे. सर्व नागरिकांनी एकोपा कायम ठेवावा. तसंच भीती आणि द्वेषाच्या कृतीपुढे झूकू नये. आपल्यासाठी मानवता हीच ईश्वर सेवा आहे. सर्वशक्तीमान परमेश्वर सर्व पाहात आहे, तो उत्तर देखील देईल. आपण भारतीय म्हणून एकजूट राहण्याची आवश्यकता आहे.
सुनील शेट्टी पुढं म्हणाला, 'भीती आणि द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींच्या जाळ्यात आपण अडकता कामा नये. उलट आपल्याला एकजूट राहावं लागेल. काश्मीर आपलं होतं, आपलं आहे आणि नेहमी आपलंच राहिल हे त्यांना दाखवावं लागेल. त्यासाठी सैन्य, नेतृत्त्व आणि प्रत्येकाच्या प्रयत्नांची सहभाग आहे.
पुढची सुट्टी काश्मीरमध्ये
पुढची सुट्टी काश्मीरमध्ये घालवावी, असं आवाहन देखील सुनील शेट्टीनं यावेळी केलं. 'आपण नागरिक म्हणून एक काम करायचं आहे. पुढची सुट्टी ही काश्मीरमध्येच घालवण्याचा निश्चय आपल्याला करायचा आहे. आम्ही घाबरत नाही. आम्हाला खरोखरच भीती वाटत नाही, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे,' असं शेट्टी यावेळी म्हणाला.
( नक्की वाचा : संपूर्ण जग फिरलेला सुपरस्टार शाहरुख खान काश्मीरमध्ये का जात नव्हता? स्वत:च सांगितलं कारण, Video )
मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गरज पडली तर काश्मीरमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. मी स्वत:हून त्यांना फोन केला होता. तुम्हाला अगदी उद्या मी तिथं जावं असं वाटत असेल तर मी तयार आहे. पर्यटक म्हणून किंवा कलाकार म्हणून शूटींग करायची असेल तर आम्ही ती नक्की करु. काश्मिरी मुलांची यामध्ये काहीही चूक नाही, असंही तो यावेळी म्हणाला.