Sunil Shetty Rejects 40 Crore Offer for Tobacco Ad: बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी सध्या त्याच्या फिटनेस आणि स्पष्टवक्तेपणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वयाच्या साठीकडे झुकलेला असतानाही त्याने ज्या प्रकारे स्वतःला फिट ठेवले आहे, ते पाहून तरुणही थक्क होतात. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.विशेष म्हणजे तंबाखूच्या एका जाहिरातीसाठी मिळालेली मोठी रक्कम त्याने केवळ आपल्या तत्त्वांसाठी नाकारली. हा किस्साही त्यानं सांगितला आहे.
वडिलांच्या निधनानंतर पुन्हा कामाला सुरुवात
सुनील शेट्टीने 2017 मध्ये वडील वीरप्पा शेट्टी यांच्या निधनानंतर मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सांगितले की, 2014 पासून त्याचे वडील आजारी होते आणि तो त्यांची सेवा करण्यात व्यस्त होता. वडिलांच्या निधनानंतर तो मानसिकरित्या खचला होता, पण त्याच दिवशी त्याला एका हेल्थ शोची ऑफर मिळाली.
सुनीलला हा दैवी संकेत वाटला.त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. तब्बल 5 ते 7 वर्षांच्या या ब्रेकनंतर पुन्हा इंडस्ट्रीत परतताना तो सुरुवातीला थोडा अस्वस्थ होता, पण हळूहळू त्याने साऊथच्या चित्रपटांमधून आपली नवी इनिंग सुरू केली.
(नक्की वाचा : Dhurandhar: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video )
40 कोटी रुपयांची ऑफर धुडकावली
सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करताना दिसतात, मात्र सुनील शेट्टी याला अपवाद ठरला आहे. त्याने सांगितले की, त्याला एकदा तंबाखूच्या जाहिरातीसाठी 40 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती. एवढी मोठी रक्कम समोर असूनही त्याने त्या जाहिरातीला स्पष्ट नकार दिला.
अण्णा म्हणाला की, त्याला पैशांचा मोह कधीच पडला नाही आणि तो अशा गोष्टी कधीच करणार नाही ज्यामुळे त्याची मुलं अहान आणि अथिया यांच्यावर कोणताही डाग लागेल. त्याने जाहिरात करणाऱ्यांना ठणकावून सांगितले की, तुम्ही मला पैशाने विकत घेऊ शकत नाही. त्यानंतर अशा जाहिराती घेऊन त्याच्याकडे येण्याची कोणाची हिंमत झाली नाही.
( VIDEO : 'मी स्वतः येऊन तुझं गळा दाबेन', गावस्कर सचिनला असं का म्हणाले होते? तेंडुलकरचं सडेतोड उत्तर! )
कोव्हिडनंतर बदलली दृष्टी
सुनील शेट्टीने कोविड महामारीच्या काळानंतर स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्याने या काळात स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले. त्याने खूप वाचन केले आणि ट्रेनिंगवर लक्ष दिले. अण्णा सांगतो की, आता त्याला कोणाच्याही प्रमाणाची गरज वाटत नाही. त्याने आपल्या मेहनतीने जो आत्मविश्वास मिळवला आहे, त्या जोरावर तो आजही इंडस्ट्रीत तितक्याच ताकदीने उभा आहे. बॉक्स ऑफिसवर तो आज किती सक्रिय आहे यापेक्षा लाखो तरुण त्याला आपला आदर्श मानतात, हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.