Sunjay Kapur News: संजय कपूर यांची अब्जावधींची संपत्ती अन् 20 कोटींचा मानहानीचा दावा, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर

Sunjay Kapur Property News: संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता कोर्टामध्ये पोहोचलाय. प्रिया कपूर यांनी नणंदेविरोधात मानहानीचा दावा ठोकलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Sunjay Kapur Property News: संजय कपूर यांच्या पत्नीने नणंदेविरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय"

Sunjay Kapur Property News: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाला आता एक नवे वळण प्राप्त झालंय. संजय कपूर (Sunjay Kapur) यांची पत्नी प्रिया कपूर (Priya Kapur) यांनी नणंद मंधीरा कपूरविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केलाय. याद्वारे प्रिया कपूर यांनी 20 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केलीय. मंधीरा कपूर यांना आपल्याविरुद्ध कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा ते सार्वजनिक करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी प्रिया यांनी न्यायालयाकडे केलीय. यापूर्वी प्रिया कपूर यांनी मंधीरा कपूर आणि पॉडकास्टर पूजा चौधरीविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातही मानहानीचा खटला दाखल केला होता.

प्रिया कपूर यांचा आरोप | Priya Kapur News

प्रिया यांचा असा आरोप आहे की, मंधीरा आणि पूजाने सोशल मीडिया, पॉडकास्ट, मुलाखत आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्यांच्याविरोधात खोटे, अपमानास्पद आणि वैयक्तिक हल्ले करणारे विधान केले आहे. ही विधाने त्यांच्या प्रतिष्ठेला गंभीर हानी पोहोचवणारी आहेत आणि त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संजय कपूर यांच्या मालमत्तेचा वाद नेमका काय?

हा संपूर्ण वाद संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या अब्जावधींच्या संपत्तीवरून सुरू झाला आहे. संजय कपूर यांनी तीन लग्न केली होती. पत्नी करिश्मा कपूरपासून त्यांना दोन मुले आहेत, तर प्रियापासून त्यांना एक मुलगा आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्ता, इच्छापत्र आणि ट्रस्टशी संबंधित मुद्यांवरून न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत.

मंधीरा कपूर यांचे प्रत्युत्तर

प्रिया यांना सर्व संपत्तीर हक्क प्रस्थापित करायचाय, असा आरोप मंधीरा कपूर यांनी केला होता. प्रिया यांनी हे आरोप फेटाळून लावत मानहानीचा दावा ठोकलाय. दिल्ली न्यायालयाने यापूर्वीच फौजदारी मानहानीच्या प्रकरणात मंधीरा आणि पूजा चौधरी यांना नोटीस बजावलीय. या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आरोपांना उत्तर देताना मंधीरा कपूर यांनी म्हटले होते की, कोणतेही खोटे विधान केलेले नाही आणि हा विषय केवळ पैशांचा नसून सत्याचा आहे. या कौटुंबिक वादाचे आता कायदेशीर लढाईत रूपांतर झालंय. यामध्ये मानहानी, संपत्तीची वाटणी आणि इच्छापत्राचे दावे या गोष्टींचा समावेश आहे. 

Advertisement
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )