Priya Kapur Affidavit Controversy : अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या संपत्तीच्या वादानं आता नवं वळण घेतलं आहे. या प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. त्यानुसार संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्या कथित कॉल डिटेल्स रेकॉर्ड्समुळे (CDR) सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.संजय कपूर यांच्या 30000 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वारसाहक्क प्रकरात दिल्ली उच्च न्यायालयात सध्या खटला सुरु आहे.
प्रिया कपूर यांचे दावे आणि तांत्रिक पुरावे
मंगळवारी रात्री उशिरा प्रिया कपूर यांच्याशी संबंधित कॉल रेकॉर्ड्सची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या माहितीनुसार, 21 मार्च 2025 रोजी प्रिया कपूर यांचे लोकेशन दिल्लीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. ही तीच तारीख आहे ज्या दिवशी संजय कपूर यांचे वादग्रस्त मृत्युपत्र तयार करण्यात आले होते.
प्रिया कपूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे असे सांगितले होते की, मृत्यूपत्र तयार होत असताना त्या स्वतः गुरुग्राममध्ये उपस्थित होत्या. मात्र, आता समोर आलेले हे तांत्रिक पुरावे त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
( नक्की वाचा : 'Mary Kom चे ज्युनियर बॉक्सरशी अफेअर, माझ्याकडे WhatsApp चॅटचे पुरावे'; माजी नवऱ्याचा 'बॉम्ब' )
प्रिया कपूर यांनी न्यायालयात शपथ घेऊन जे दावे केले होते, त्याला हे इलेक्ट्रॉनिक पुरावे थेट छेद देत आहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते, जेव्हा प्रतिज्ञापत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यामध्ये तफावत आढळते, तेव्हा न्यायालयाचा दृष्टिकोन अत्यंत कडक होतो. एक छोटीशी विसंगती देखील संपूर्ण प्रकरणाची विश्वासार्हता धोक्यात आणू शकते.
मृत्युपत्रातील त्रुटींनी वाढवली शंका
संजय कपूर यांची मुले समायरा आणि कियान यांच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून या मृत्युपत्रावर आक्षेप घेतले जात आहेत. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मृत्युपत्रातील अनेक चुकांकडे लक्ष वेधले आहे. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक, सर्वनामांचा चुकीचा वापर आणि इतर अंतर्गत विसंगतींचा समावेश आहे.
एका मोठ्या बिझनेस एम्पायरच्या मालकाचे मृत्युपत्र इतके ढोबळ असू शकते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ वकिलांच्या मते, इतक्या मोठ्या संपत्तीच्या बाबतीत कागदपत्रे अत्यंत बिनचूक असणे आवश्यक असते.
( नक्की वाचा : Sunjay Kapur Will :संजय कपूर यांच्या मृत्युपत्रात 'डिजिटल घोस्ट'चा वावर? कथित मृत्युपत्रावर कोर्टात गंभीर दावा )
तज्ज्ञांचे मत आणि न्यायालयाची भूमिका
कौटुंबिक कायद्यातील तज्ज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की, मृत्युपत्र तयार होताना लाभार्थ्याची उपस्थिती असणे कायद्याने अनिवार्य नाही. असे असतानाही प्रिया कपूर यांनी आपण तिथे उपस्थित होतो, असा आग्रह का धरला असावा, हा आता तपासाचा विषय ठरत आहे. जर त्यांची उपस्थिती आवश्यक नव्हती, तर मग त्यांनी प्रतिज्ञापत्रात तसा दावा का केला, या प्रश्नाने प्रकरणातील गूढ वाढवले आहे.
या प्रकरणाचा निकाल आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या हातात आहे. कोणते पुरावे स्वीकारायचे आणि काय सत्य मानायचे, हे न्यायालय ठरवेल. मात्र, सध्या तरी कॉल रेकॉर्ड्स आणि तज्ज्ञांची मते यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून, एका छोट्याशा मोबाईल सिग्नलमुळे या मोठ्या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.