Bollywood Richest Family : बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाचा विषय येतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात आधी कपूर, बच्चन किंवा चोप्रा या कुटुंबाचे नाव येते. कारण अनेक वर्षांपासून या घराण्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की यापैकी कोणतही कुटुंब या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर नाही. बॉलिवूडची खरी 'मनी पॉवर' कुमार कुटुंबाकडे, म्हणजेच टी-सीरीज (T-Series) च्या मालकांकडे आहे. या कुटुंबाच्या कंपनीने केवळ संगीत क्षेत्रातचतच नाही, तर चित्रपटांच्या माध्यमातूनही अरबोंची कमाई केली आहे. आज टी-सीरीज कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 10,000 कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीतील इतर सर्व मोठ्या घराण्यांना मागे टाकले आहे.
गुलशन कुमार यांनी सुरु केली टी-सीरीज
टी-सीरीजच्या या साम्राज्याची सुरुवात गुलशन कुमार यांनी 1983 साली केली होती. त्या काळात जेव्हा म्युझिक कॅसेट्सचा ट्रेंड नवीन होता, तेव्हा गुलशन कुमार यांनी त्यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेच्या जोरावर संगीत घरोघरी पोहोचवले. 'कयामत से कयामत तक' चित्रपटातील गाण्यांमुळे कंपनीला मोठी ओळख मिळाली आणि त्यानंतर 'आशिकी' चित्रपटाचे संगीत रेकॉर्डब्रेक हिट झाले. यानंतर टी-सीरीज हे नाव प्रत्येक घरात पोहोचले. आज हीच कंपनी भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे आणि जगातील सर्वाधिक सबस्क्राईबर असलेले यूट्यूब चॅनल देखील आहे.
भूषण कुमार यांनी वारसा नेला पुढे
गुलशन कुमार यांचा वारसा त्यांचे पुत्र भूषण कुमार आणि काका कृष्ण कुमार यांनी यशस्वीरित्या पुढे नेला. भूषण कुमार हे सध्या टी-सीरीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत प्रोड्यूसर मानले जाते.
(नक्की वाचा- VIDEO: रानात बसून 27 लाखांचे 'पॅकेज'; मेंढपाळाचं जबरदस्त बिझनेस मॉडेल ऐकून थक्क व्हाल!)
भूषण कुमार यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेली संगीताचा वारसा केवळ सांभाळलाच नाही, तर तो कित्येक पटीने वाढवला. आता टी-सीरीजने संगीतानंतर चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. 'भूल भुलैया 2' आणि 'तू झूठी मैं मक्कार' यांसारखे सुपरहिट चित्रपट त्यांच्या बॅनरखाली बनले आहेत. लवकरच 'भूल भुलैया 3' आणि 'मेट्रो... इन दिनों' सारखे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
इतर श्रीमंत कुटुंबे शर्यतीत मागे
कुमार कुटुंब 10,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह या शर्यतीत अव्वल ठरले आहे. टी-सीरीज कुटुंबानंतर दुसऱ्या क्रमांकावर यशराज फिल्म्सचे मालक असलेले चोप्रा कुटुंब येते. आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची एकूण संपत्ती सुमारे 8,000 कोटी रुपये आहे.
तिसऱ्या क्रमांकावर महानायक अमिताभ बच्चन यांचे कुटुंब आहे, ज्यांची संपत्ती सुमारे 4,500 कोटी रुपये आहे. तर, करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांसारखे स्टार्स असलेल्या कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 2,000 कोटी असल्याचं सांगितलं जातं.