टीव्ही इंडस्ट्रीत काम करणे सोपे नाही. मोठ्या शिफ्टपासून ते मानधनाच्या बाबतीतही अनेकदा समस्या येतात. तरीही, काही यशस्वी अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक संकटांनी भरलेले होते. त्यापैकीच एक म्हणजे टीव्हीवरील 'कोमोलिका' अर्थात उर्वशी ढोलकिया. उर्वशीने वयाच्या 6 व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. तिने 16 व्या वर्षी लग्न केले होते. ती इतकी प्रेमात होती की तिने लग्नानंतर सर्व काही सोडण्याचा निर्णय घेतला होता. उर्वशी ढोलकियाने अनेकदा तिच्या घटस्फोटाबद्दल बोलले आहे. 18 व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. तेव्हा ती दोन मुलांची आई होती. घटस्फोटानंतर तिने स्वतःला एक महिन्याचा वेळ दिला. त्यानंतर पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की तिला नेहमीच परीकथेसारखे आयुष्य हवे होते. ज्या व्यक्तीसोबत तिने लग्न केले, त्याच्या प्रेमात पडल्यावर तिला एका 'राजकुमारी'सारखे वाटले. ती म्हणाली, 'आम्ही एका वर्षापेक्षा जास्त काळ एकमेकांना डेट केले. मी माझे करिअर सोडून संसार थाटण्यासाठी तयार होते. ती पुढे म्हणाली, 'मी प्रेमात वेडी झाले होते. त्या वेळी, एक स्त्री म्हणून, लग्नाचा विचार तुमच्या मनात रुजलेला असतो. माझी आई पारंपरिक विचारांची होती. तिने स्पष्टपणे सांगितले होते, 'स्वतंत्र राहा, पण लग्न कर.' तेव्हा समाज तसाच होता. मी 16 वर्षांची होते. तितकी समजूतदार नव्हते. मला वाटायचे, आता मला काम करायचे नाहीये, आता मला सिंड्रेलासारखे आयुष्य जगायचे आहे. असं तिने या मुलाखतीत सांगितलं.
उर्वशी म्हणाली, 'जेव्हा तो फुगा फुटला, तेव्हा मला समजले नाही की 16 व्या वर्षी माझे लग्न झाले. 17 व्या वर्षी मी जुळ्या मुलांची आई झाले. आणि 18 व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यानंतर उर्वशीने घटस्फोटाचे कारण सांगितले. ती म्हणाली, 'त्याला जबाबदारी घ्यायची नव्हती आणि प्रेमही उरले नव्हते. पण मी माझ्या दोन मुलांना का सोडून देऊ? जर मला असेच करायचे असते, तर मी त्यांना जन्मच दिला नसता. उर्वशीने सांगितले की, पुन्हा मजबूत होण्यासाठी तिने स्वतःला एक महिन्याचा वेळ दिला आणि कामावर परतली. तिच्या मुलांचे संगोपन तिच्या आईनेच केले आहे. ती म्हणाली, 'गरजेच्या वेळी तुमच्या आई-वडिलांपेक्षा जास्त कोणीही साथ देत नाही. तिने पुढे सांगितले की ती 19 व्या वर्षी कामावर परतली, कारण तिला तिच्या आई-वडिलांवर 'ओझे' व्हायचे नव्हते.