
Veteran Comedian Asrani Passed Away : हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि दिग्गज अभिनेते असरानी (Asrani) यांचे 84 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ‘गोवर्धन असरानी' असे पूर्ण नाव असलेल्या या सदाबहार हास्य कलाकाराने आपल्या अचूक ‘कॉमिक टाइमिंग' आणि खास शैलीने अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सुरुवातीची कारकीर्द
जयपूरमध्ये 1 जानेवारी 1941 रोजी जन्मलेल्या असरानी यांचे सुरुवातीचे शिक्षण जयपूरमधील सेंट झेवियर स्कूल (St. Xavier School, Jaipur) येथे झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी राजस्थान कॉलेजमध्ये (Rajasthan College) गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयापूर्वी रेडिओ आर्टिस्ट म्हणूनही काम केले होते.
संघर्षमय पदार्पण
असरानी यांनी 1960 च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण बॉलिवूडमध्ये पाय रोवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. खूप संघर्षानंतर त्यांना जया भादुरी (Jaya Bhaduri) अभिनित ‘गुड्डी' (Guddi) या चित्रपटातून संधी मिळाली. हा चित्रपट हिट झाला, पण तरीही सुरुवातीला लोक त्यांना 'कमर्शियल ॲक्टर' मानत नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, दिग्दर्शक गुलजार (Gulzar) यांनीही त्यांना सुरुवातीला 'कमर्शियल ॲक्टर' मानले नव्हते, ते म्हणाले होते, "ना ना... काहीतरी वेगळाच चेहरा आहे." मात्र, एकदा त्यांनी अभिनयात आपले कौशल्य सिद्ध केले, तेव्हा त्यांना मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही आणि त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
( नक्की वाचा : OMG : बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत थरार! जेव्हा शाहरुख खानने वाचवला एकाच जीव, ऐश्वर्या रायशी खास कनेक्शन )
अविस्मरणीय भूमिका आणि वैयक्तिक जीवन
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले' (Sholay) या अजरामर चित्रपटातील 'अंग्रेज़ों के जमाने का जेलर' (Angrezon Ke Zamane Ka Jailer) ही त्यांची भूमिका आजही लोकांच्या मनात ताजी आहे. याशिवाय, ‘खट्टा मीठा' (Khatta Meetha) आणि ‘चुपके चुपके' (Chupke Chupke) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांच्या पत्नीचे नाव मंजू बन्सल इराणी (Manju Bansal Irani) आहे. विशेष म्हणजे, हे दोघे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.
राजकीय सहभाग
अभिनय कारकीर्दीसोबतच त्यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी साल 2004 मध्ये काँग्रेस पक्षाचे (Congress Party) सदस्यत्व घेतले होते आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले होते. अभिनयातील त्यांच्या योगदानामुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच आदराने ओळखले जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world