Ilayaraja: ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर

आतापर्यंत त्यांनी 7,000 हून अधिक गाणी तसेच 1,500 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अकरावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे
  • पद्मपाणि पुरस्कार संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना जाहीर झाला आहे
  • पद्मपाणि पुरस्कारात पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 28 जानेवारी ते रविवार 1 फेब्रुवारी 2026  या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. 

पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात  28 जानेवारी  रोजी सायंकाळी 5:30 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी 7,000 हून अधिक गाणी तसेच 1,500 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत  निर्मिती केली आहे.

नक्की वाचा - Mumbai Next Mayor: मुंबईत महापौरपदावरून ट्वीस्ट! शिंदेंनी डाव टाकला, मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार?

तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे. चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना ही इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे.  कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ‘इसैग्नानी' (संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व) म्हणून ओळखले जातात. 

नक्की वाचा - Beed News: देव दर्शनासाठी घेऊन गेले, बीडच्या महिलांना पुण्यात बोगस मतदान करायला लावले, पुढे जे घडले...

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ. आशिष गाडेकर, कला संचालक डॉ. शिव कदम, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.

Advertisement