मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीl अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू फसल, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका केली. विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.
शरद पवार यांनी देखील विजय कदम यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, "मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जेष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं.मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली..!!"