आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्ना याच्या भूमिकेचं मोठं कौतुक केलं जात आहे. अक्षय खन्ना हा बॉलिवूडचे अभिनेते विनोद खन्ना यांचे सुपूत्र. विनोद खन्नांचं स्टारडम आणि आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र खूप कमी जणांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमसंबंधाबाबत माहीत आहे.
विनोद खन्नाची पहिली पत्नी, गीतांजली तलेखारखान कौन होती?
विनोद खन्नांची पहिली पत्नी गीतांजली एक मॉडेल होती आणि पारसी कुटुंबाशी संबंधित होती. तिच्या कुटुंबात वकील आणि व्यावसायिक होते. गीतांजली ए.एफ.एस तलेयारखानच्या कन्या. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला ते पहिले समालोचक होते.
पहिली भेट कशी झाली?
विनोद खन्ना आणि गीतांजली तलेयारखान यांची पहिली भेट कॉलेजच्या दिवसात झाली होती. गीतांजली यांच्या सौंदर्यावर विनोद खन्ना फिदा झाले होते. कॉलेज काळापासून ते एकमेकांना डेट करीत होते. त्यावेळी विनोद खन्ना चित्रपटात क्षेत्रात आले नव्हते. यादरम्यान निर्माते सुनील दत्त यांनी विनोद खन्नांना पाहिलं आणि त्यांना मन का मीतची ऑफर दिली.
चित्रपट क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर विनोद खन्नांनी लग्नाचा निर्णय घेतला. १९७१ मध्ये त्यांनी गीतांजलीसोबत लग्न केलं आणि हा एक जबरदस्त कार्यक्रम होता जिथं बॉलिवूडमधील प्रसिद्ध मान्यवर सहभागी झाले होते. १९७५ मध्ये अक्षय खन्नाचा जन्म झाला. यादरम्यान त्यांचं आयुष्य छान सुरू होतं. कौटुंबिक जबाबदारी पाहता त्यांनी रविवारी काम न करण्याची पॉलिसी तयार केली होती. सुट्टीचा दिवस ते आपल्या कुटुंबासोबत घालवत.
विनोद खन्ना आणि गीतांजली तलेयारखान यांच्या घटस्फोटाचं कारण...
विनोद खन्ना अभिनय क्षेत्राच्या शिखरावर होते आणि त्यांचं छोटसं कुटुंब होतं. यादरम्यान विनोद खन्ना यांना अध्यात्मिकतेकडे ओढले गेले. सर्व काही असतानाही त्यांना कमतरता जाणवत होती. त्यांनी १९८२ मध्ये संन्यास घेतला. त्यांनी ओशो आश्रमासाठी बॉलिवूड आणि कुटुंबाला सोडलं. यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं.
सुरुवातीला विनोद खन्ना अमेरिकेत होते. ते त्यांची पत्नी आणि कुटुंबाशी फोन कॉलद्वारे संपर्कात राहायचे. पण दोन मुलं आणि पत्नीसाठी हे पुरेसे नव्हते. गीतांजली यांनी एकट्याने मुलांना वाढवण्याच्या अडचणी सांगितल्या. मुलांना त्यांच्या बाबांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
पतीने कुटुंबाचा त्याग करणं गीतांजली यांना फारसं आवडलं नव्हतं. त्यांनी विनोद खन्ना यांना कुटुंब आणि अध्यात्म दोघांपैकी एक गोष्ट निवडण्यास सांगितलं. मात्र कोणतंही उत्तर न मिळाल्याने त्यांना घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि १९८५ मध्ये अधिकृतपणे दोघं वेगळं झाले. विनोद खन्ना १९८७ मध्ये भारतात परतले.
गीतांजली यांनी कधी दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी दोन्ही मुलांचा एकट्याने सांभाळ केला. २०१८ मध्ये ७० व्या वर्षी गीतांजली यांचं निधन झालं. त्यापूर्वी २०१७ मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं.