Vivek Agnihotri on Maharashtrian Food : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या 'The Bengal Files' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहेत. पण नुकतेच ते एका विधानामुळे वादात सापडले. एका मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रीयन जेवणाला 'शेतकऱ्यांचे गरीब जेवण' म्हंटले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली. विवेक त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासोबत कर्ली टेल्सच्या यूट्यूब चॅनलवर पोहोचले होते. त्यावेळी बोलताना पल्लवीने सांगितले की, लग्नाच्या सुरुवातीला विवेक यांना महाराष्ट्रीयन जेवण अजिबात आवडत नव्हते.
नेमकं काय घडलं?
पल्लवी जोशी म्हणाल्या की, "मी काहीही बनवले तरी ते म्हणायचे, हे काय गरिबांचे जेवण खाता? कारण मराठी जेवण खूप साधे असते. भाजी फक्त हलकीशी परतून खातात. ते हीच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणायचे. पण आता त्यांना तेच जेवण सर्वात जास्त हेल्दी आणि चांगले वाटते."
विवेक यांनी सांगितले की, त्यांना दिल्लीच्या जेवणाची सवय होती, जिथे मसालेदार आणि जास्त प्रमाणात जेवण वाढले जाते. तर महाराष्ट्राचे जेवण साधे आणि हेल्दी असते. ते म्हणाले, "सुरुवातीला मला वाटले की हे तर शेतकऱ्यांसारखे गरीब जेवण आहे. पण हळूहळू मला समजले की जेवणाचा हाच सर्वात योग्य मार्ग आहे. महाराष्ट्रीयन थाळी सर्वात हेल्दी आणि किफायती आहे." विवेक यांनी असेही सांगितले की, आता त्यांनी आपला आहार बदलला आहे. ते वनस्पती-आधारित (plant-based) अन्न खातात आणि मांसाहार व दारू सोडून दिली आहे.
( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )
टीकेनंतर स्पष्टीकरण
विवेक अग्निहोत्री यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. नेटिझन्सनी त्यांना या वक्तव्यावरुन लक्ष्य केलं. या टीकेनंतर विवेक यांनी 'द रौनक पॉडकास्ट'वर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "मी ही गोष्ट मजेमध्ये बोललो होतो. पण लोकांनी माझे विधान एडिट करून अर्धेच दाखवले. आणि मग म्हणाले की, बघा याने मराठी जेवणाला गरिबांचे जेवण म्हटले आहे. त्यामुळे मला विनाकारण वादात ओढू नका."