Dharmendra News : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार धर्मेंद्र देओल यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी २४ नोव्हेंबरला निधन झालं. दिग्गज अभिनेता अभिनय, चित्रपटं आणि मनमिळाऊ व्यवहारासाठी नेहमी स्मरणात राहतील. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंजाबमधील एक लहानसं गाव सोडून ते मुंबईला आले. आणि काही वर्षात स्टार झाले. मात्र या झगमगाटात ते आई-वडिलांचे संस्कार विसरले नाहीत. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबरला झाला होता. आज त्यांचा ९० वा वाढदिवस आहे.
वडिलांच्या आठवणीत कडुबिंबाच्या झाडाखाली....
दरम्यान पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एका जुन्या मुलाखतीत आई-वडिलांच्या आठवणीत काही उद्गार काढले होते. ते पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी लिहिलेली एक कविताही ऐकवली. धर्मेंद्र वडिलांच्या आठवणीत म्हणाले, माझ्या वडिलांनी कडुलिंबाचं झाड लावलं होतं. ते आज खूप मोठं झालं आहे. जेव्हा कधी वडिलांची आठवण येते मी त्या कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन बसतो. असं वाटतं की बाबा माझ्याजवळ आहेत आणि मला हाक मारत आहे...धरम मी तुझ्याजवळच असल्याचं सांगत आहे.
ते पुढे म्हणाले, माझ्या आई-वडिलांनी मला कायम माणुसकीने जगायला शिकवलं. त्यांनी दिलेले संस्कार हीच माझी सर्वात मोठी धनदौलत आहे. हीच शिकवण आणि दौलत मी माझ्या मुलांनाही दिली आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलांना.. आम्हाला जाती-धर्माबद्दल सांगितलं नाही, तू चांगला माणूस हो असंच सांगण्यात आलं.
जेव्हा आम्ही मित्र व्हायचे तेव्हा ते बाबा व्हायचे....
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले आणि दोन्ही संसार सांभाळले. सनी देओल, बॉबी देओल आणि इशा देओल यांच्यावर चांगले संस्कार दिले. सनी आणि बॉबी देओल जेव्हा कधी वडिलांबद्दल बोलत त्यांचे डोळे पाणावत. एका मुलाखतीदरम्यान सनी देओलने एक किस्सा शेअर केला होता. त्याने सांगितलं, बाबा आम्हाला नेहमी म्हणायचे की तू मला मित्र समज, मित्रासारख्या गप्पा मार. मात्र जेव्हा आम्ही मित्र व्हायचे तेव्हा ते बाबा व्हायचे.