Yogita Chavan and Saurabh Choughule: मराठी कलाविश्वातील 'जीव माझा गुंतला' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले कलाकार योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या दोघांनी 2024 मध्ये विवाह केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी एकत्र असलेले कोणतेही फोटो किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.
दिवाळीला नव्हते एकत्र
यंदा दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणावेळीही त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. दोघांनी त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवरून डिलीट केले आहेत. याशिवाय दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे योगिता आणि सौरभ विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात सुरू आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप या चर्चांवर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.