क्रेडिट स्कोअर, हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की तुम्ही वेळेवर लोन भरूनही तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) कमी होऊ शकतो? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला क्रेडिट स्कोअरची संपूर्ण 'ABCD' समजून घ्यावी लागेल. क्रेडिट स्कोअर काय आहे, तो कसा काम करतो आणि बँकांना त्याबद्दल माहिती कधी मिळते, हे सर्व समजल्यावर तुम्हाला यामागचं खरं कारण कळेल.
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
CIBIL स्कोअरचं पूर्ण नाव 'क्रेडिट इन्फॉर्मेशन स्कोअर' आहे. याची मर्यादा 300 ते 900 च्या दरम्यान असते. तुमचा स्कोअर जितका 300 च्या जवळ असेल, तितका तो खराब मानला जातो. याउलट, जितका तो ९०० च्या जवळ असेल, तितका तो चांगला मानला जातो. CIBIL स्कोअर तयार करण्याचा मुख्य उद्देश हा आहे, की बँक तुम्हाला लोन देण्याआधी तुमची आर्थिक पार्श्वभूमी तपासू शकेल. CIBIL स्कोअरसोबतच CIBIL रिपोर्टही दिला जातो, ज्यात लोन घेण्यापासून ते ते फेडण्यापर्यंतची सर्व माहिती असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, CIBIL एक आरसा आहे, ज्यात बँक हे पाहू शकते की तुम्हाला लोन दिल्यावर त्यांना धोका तर नाही ना.
CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट कोण जारी करतं?
भारतात CIBIL स्कोअर आणि रिपोर्ट जारी करण्याची जबाबदारी क्रेडिट ब्यूरो (TransUnion CIBIL Limited) ची आहे. क्रेडिट ब्यूरोकडे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या पॅन कार्डचे तपशील असतात. या तपशिलांच्या आधारे, ते बँकांकडून तुमच्या घेतलेल्या कर्जाची माहिती घेत राहतात. उदाहरणार्थ, तुम्ही 'बँक अ' कडून 10,000 रुपयांचं कर्ज घेतलं, तर बँक याची माहिती क्रेडिट ब्यूरोला देईल. तसेच, वेळोवेळी कर्जाच्या स्थितीबद्दल अपडेट्सही देत राहील. आता, जर तुम्ही 'बँक ब' कडे 15,000 रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला, तर 'बँक ब' तुमच्याबद्दलची माहिती क्रेडिट ब्यूरोकडून घेईल, ज्यामुळे त्यांना कळेल की तुम्ही आधीही एक कर्ज घेतलं आहे आणि ते तुम्ही वेळेवर फेडत आहात की नाही. जर 'बँक ब' ला कळालं की तुम्ही पहिल्या बँकेचं कर्ज वेळेवर फेडत नाही, तर तुम्हाला दुसरं कर्ज देण्यास नकार दिला जाईल किंवा जास्त व्याजदरावर देण्यास तयार होतील. असं यासाठी होतं, कारण तुम्हाला कर्ज देण्यामध्ये धोका आहे.
क्रेडिट ब्यूरोपर्यंत माहिती न पोहोचणं
आता मूळ मुद्द्यावर येऊया, की तुम्ही वेळेवर कर्ज फेडताय, पण तरीही तुमचा CIBIL स्कोअर का कमी होत आहे? याचं कारण असं असू शकतं की तुम्ही दर महिन्याला कर्जाचा हप्ता भरत आहात, पण तुमची बँक ही माहिती क्रेडिट ब्यूरोपर्यंत पोहोचवू शकली नाही, ज्यामुळे तुमचा CIBIL रिपोर्ट अपडेट झाला नाही. यात तुमची कोणतीच चूक नसतानाही तुम्हाला याचं नुकसान भोगावं लागतं.
बँकेशी लगेच संपर्क साधा
म्हणूनच, वेळेवर कर्जाचा हप्ता भरणं पुरेसं नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा CIBIL स्कोअर कमी होत आहे आणि रिपोर्टमध्ये काही अपडेट होत नाहीये, तर लगेच तुमच्या बँकेशी संपर्क साधा. काही तांत्रिक अडचणीमुळे माहिती पुढे जात नसावी.