Indian Rupee Currency Notes: येत्या काळात देशातील कागदी नोटा बंद होणार आणि त्यांची जागा प्लास्टिकच्या नोटा घेणार, अशा चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहेत. तुमच्या खिशातील किंवा पर्समधील 100, 200 आणि 500 रुपयांच्या कागदी नोटा लवकरच बाद होणार असल्याच्या दाव्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वतीने अधिकृत स्पष्टीकरण समोर आले असून या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय आहे अफवा?
सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये थेट आरबीआयचा हवाला देत असा दावा केला जात आहे की, येत्या 30 जून 2026 पासून बाजारातील सर्व कागदी नोटा टप्प्याटप्प्याने मागे घेतल्या जातील आणि त्याऐवजी संपूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जातील. 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला होता.
काय आहे सत्य?
सोशल मीडियावरील हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले आहे. पीआयबीने या व्हायरल मेसेजचा तपास करून सत्य जनतेसमोर आणले आहे. आरबीआयने कागदी नोटा बंद करण्याचा किंवा त्या बदलून प्लास्टिक नोटा आणण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पीआयबीने अधिकृतपणे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
प्लास्टिक नोटांविषयी आरबीआयची नेमकी भूमिका काय
कागदी नोटा बंद होणार नसतील, तर मग प्लास्टिक नोटांची चर्चा का सुरू झाली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (एमपीसी) बैठकीनंतर गव्हर्नरांनी देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटा आणण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते.
मात्र, हा विचार सध्या अगदी प्राथमिक पातळीवर आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या पॉलिमरच्या नोटा वापरल्या जातात. या नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित असतात. भारतातही भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून काही नोटा प्रायोगिक तत्त्वावर आणण्याची तयारी सुरू आहे, पण याचा अर्थ सध्याच्या कागदी नोटा बंद केल्या जातील असा अजिबात नाही.
( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा
आर्थिक बाबींशी संबंधित अशा संवेदनशील बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी नागरिकांनी नेहमी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. चलनाबाबत किंवा नोटांविषयी कोणताही मोठा निर्णय झाल्यास त्याची माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे अशा व्हायरल दाव्यांची सत्यता नेहमी अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी.