सोन्याचे दर गेल्या काही काळात गगनाला भिडताना दिसत आहे. सोना प्रतितोळा एक लाखाचा आकडा गाठणार अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत सोने खरेदीदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एक महिन्यानंतर सोन्याच्या दरात एक हजाराची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही दोन हजाराने घसरण झाली आहे. अनेक दिवसानंतर सोन्याचे भाव पडल्यामुळे जळगाव सुवर्णनगरीत सोने खरेदी करण्यासाठी गर्दी झालेली दिसते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या महिन्याभरापासून सोन्याचा दरात सतत वाढ झालेली दिसून येत आहे. जागतिक स्तरावर असलेल्या अस्थिरतेमुळे सातत्याने सोन्याच्या भावात वाढ कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महिन्याभरानंतर सोन्याच्या भावात आज शनिवारी एक हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत असताना, दुसरीकडे चांदीच्या दरात ही कपात झाल्याचे शनिवारी दिसून आले आहे.
जळगाव सुवर्णनगरीत आज शनिवारी सोन्याचे भाव 85 हजार रुपये होता. तर जीएसटी सह सोन्याचा भाव 87 हजार 550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला. सोन्याचा भाव एक हजारांनी कमी झाला आहे. चांदीचे भाव 97 हजार 500 रुपये, तर जीएसटीसह 1 लाख 500 रुपये आहे. चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी कपात झाली आहे. दरम्यान सोन्याच्या भावात घसरण होताच जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यामुळे सोन्याचा दर एक लाखापर्यंत पोहोचणार अशी स्थिती होती. सोन्यामध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा मिळेल असंही सांगितलं जात होते. त्यात आता एक हजाराने दर कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही आता सुवर्णसंधी आहे. हीच संधी साधून अनेक जण आज सोने खरेदी करत असताना दिसले. मात्र सोन्याच्या दरातील चढ उतार पाहाता पुढे काय होणार हे आताच सांगणे कठीण आहे.