ज्या गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्व आणि दूरदृष्टी दाखवत सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्यांच्यासाठी 2024 हे वर्ष छप्परफाड कमाईचे वर्ष ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून वर्ष संपेपर्यंत सोन्यातील गुंतवणुकीवर किमान 19 टक्के परतावा मिळाला आहे. याच काळात सेन्सेक्सने (Sensex) 8.35 टक्के परतावा दिला आहे. या परताव्यापेक्षा सोन्याने दिलेला परतावा हा दुपटीहून जास्त आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, जी 23 डिसेंबर 76,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,190 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला होता म्हणजेच या वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने 19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
नक्की वाचा : चखण्याची दरवाढ पाहून चकणे होण्याची पाळी, थर्टी फर्स्ट महागात पडणार
सोने महाग झाल्याने चांगला परतावा
संपूर्ण जगात, महागाईमुळे होणारे नुकसानीची झळ कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय मानला जातो. महागाई वाढली की सोन्याचे दरही वाढतात. सोबतच महागाईमुळे चलनाचे अमूल्यन होते त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होतो.
व्याज दर आणि सोन्याचे दर यांचे विळ्या भोपळ्याचे नाते
व्याज दर आणि सोन्याचे दर यांचे नाते सातत्याने विळ्या भोपळ्याचे असते. व्याज दर वाढले की सोन्याचे दर घसरतात आणि व्याज दर कमी झाले की सोन्याचे दर वाढतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सलग चार महिने अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात फेडने व्याज दरात कपात केली होती. यामुळे या चार महिन्यात सोन्याचे दर झपाट्याने वाढत गेल्याचे पाहायला मिळाले.
नक्की वाचा : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही
भारतातील सोन्याची मागणी 700 ते 750 असण्याची शक्यता
भारतामध्ये सोन्याचे दर वाढलेले असोत अथवा घटलेले, त्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे भारतीय मंडळी सोने खरेदीकडे फक्त गुंतवणूक म्हणून न पाहाता, अडचणीच्यावेळी धावून येणारा झटकन पैसे देणारा सुरक्षित मार्ग म्हणूनही पाहतात. अतिशय अडचण असली तरच भारतीय मंडळी सोनं विकताना दिसतात, अन्यथा ते सातत्याने थोडं-थोडं सोनं खरेदी करत राहातात. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सोन्याची मागणी ही अंदाजे 700 ते 750 टन असावी असा अंदाज आहे.
रिझर्व्ह बँकेने खरेदी केले 77 टन सोने
जगभरातील मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याचे दर वाढण्याचे हे देखील एक कारण आहे. जानेवारीपासून ऑक्टोबरदरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 77 टन सोने खरेदी केले आहे. 2023 मध्ये पहिल्या 10 महिन्यात जेवढं सोनं रिझर्व्ह बँकेने खरेदी केले होते त्याच्या 5 पट अधिक सोने यावर्षी खरेदी केले आहे. तुर्कस्तान आणि पोलँडने याच काळात अनुक्रमे 72 आणि 69 टन सोनं खरेदी केले आहे.