भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) म्हटले आहे की, कंपनीची कसून तपासणी केल्यानंतर अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये स्वतःहून गुंतवणूक केली आहे. हे तिच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार केले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा भाग असलेल्या अर्थ सेवा विभाग किंवा इतर कोणत्याही संस्थेने या गुंतवणुकीच्या निर्णयांवर प्रभाव टाकला नाही. LIC ने गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर आधारित आणि सखोल संशोधन करून गुंतवणुकीचे निर्णय घेतले आहेत. भारतातील टॉप 500 कंपन्यांमधील तिची गुंतवणूक 2014 पासून दहा पटीने वाढली आहे, जी 1.56 लाख कोटी रुपयांवरून 15.6 लाख कोटी रुपये झाली आहे. यावरून LIC चे फंड व्यवस्थापन मजबूत असल्याचे दिसून येते.
नियम, निकषांचे पालन करूनच गुंतवणूक, LIC चे स्पष्टीकरण
LIC ने या गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्रपणे, संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार आणि सखोल संशोधन करून घेतल्याचे सांगितले. कंपनीने म्हटले आहे की, कंपनीने केलेली सगळी गुंतवणूक विद्यमान धोरणे, कायदे आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेतले आहेत. कंपनीच्या सर्व भागधारकांना लाभ मिळावा या उद्देशानेच ही गुंतवणूक केल्याचेही LIC चे म्हणणे आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्तात LIC वर आरोप करण्यात आले होते, या सगळ्या आरोपांना LIC ने खणखणीत उत्तर दिले आहे. अदाणी समूहावर आर्थिक आणि खटल्याचे संकट घोंघावत असताना LIC ने केलेल्या गुंतवणुकीवर वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीत सवाल उपस्थित करण्यात आले होते. LIC ने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निर्देशावरून ही गुंतवणूक केल्याचाही आरोप या बातमीत करण्यात आला होता.
प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
वॉशिंग्टन पोस्टच्या या बातमीमध्ये म्हटलंय की, LIC ने मे 2025 मध्ये अदाणी पोर्ट्स अँड एसईझेड (APSEZ) मध्ये 570 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली होती. मात्र ही कंपनी भारतात सर्वोच्च 'AAA' क्रेडिट रेटिंग असलेली कंपनी असल्याचे दाखवत LIC ने आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद केली आहे. एलआयसीने म्हटले आहे की, वित्तीय सेवा विभाग किंवा इतर कोणतीही संस्था त्याच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव टाकत नाही. हे सगळे आरोप LIC आणि भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी पोहचण्यासाठी केले जात असल्याचे LIC ने म्हटलंय.
सर्वाधिक गुंतवणूक ITC हॉटेल, SBI मध्ये
एलआयसी हा लहान, एक-उद्देशीय निधी नाही. तो भारतातील सर्वात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आहे, ज्याची मालमत्ता 41 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे (500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त). तो 351 सार्वजनिक सूचीबद्ध समभागांमध्ये (2025 च्या सुरुवातीस) गुंतवणूक करतो, ज्यात जवळजवळ प्रत्येक मोठ्या व्यवसाय गट आणि क्षेत्राचा समावेश आहे. अदाणी समूहातील एलआयसीची गुंतवणूक समूहाच्या एकूण कर्जाच्या 2% पेक्षा कमी आहे. इक्विटीबाबत बोलायचे झाल्यास LIC ची सगळ्यात मोठी गुंतवणूक ही अदाणी समूहातील नसून ती रिलायन्समध्ये, 6.94% (1.33 लाख कोटी रुपये), आयटीसी लिमिटेड 15.86% (82,800 कोटी रुपये), एचडीएफसी बँक 4.89% (64,725 कोटी रुपये) आणि एसबीआयमध्ये 9.59% (79,361 कोटी रुपये) आहे.