Sachin Tendulkar: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं

Sachin Tendulkar RRP Semiconductor Connection: सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केल्याच्या अफवांमुळे एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरच्या किमतीत गेल्या एका वर्षात तब्बल 13,000% ची विक्रमी वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Sachin Tendulkar: सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केल्याच्या अफवांमुळे एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरच्या किमतीत गेल्या एका वर्षात तब्बल 13,000% ची विक्रमी वाढ झाली आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी, संबंधित कंपनी RRP सेमिकंडक्टर लिमिटेडने (RRP Semiconductors Ltd.) आता स्टॉक एक्स्चेंजला स्पष्टीकरण दिले आहे.

गुंतवणुकीच्या अफवा आणि शेअरमधील वाढ

कंपनीने मंगळवारी (14 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केली असल्याबद्दल चुकीची माहिती (Misinformation) पसरवली जात आहे. याच कारणामुळे गेल्या 10 महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपये वरून थेट 9,000 रुपये पर्यंत पोहोचली आहे, असे कंपनीला वाटते.

कंपनीचे स्पष्टीकरण 

RRP सेमिकंडक्टर लिमिटेडने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार,  सचिन तेंडुलकरने कंपनीचे कोणतेही शेअर्स कधीही खरेदी केलेले नाहीत आणि तो कंपनीचा शेअरधारक (Shareholder) नाही. सचिनचा कंपनीच्या कोणत्याही बोर्ड सदस्यांशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही. तो कंपनीच्या बोर्डाचा भाग नाही किंवा सल्लागाराची (Advisory) भूमिकाही बजावत नाही.

( नक्की वाचा : Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं? )
 

सचिन तेंडुलकर हा कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador) देखील नाही. या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या प्लँटसाठी 100 एकर जमीन मिळालेली नाही.

Advertisement

आर्थिक स्थिती आणि शेअरची किंमत

कंपनीने मान्य केले आहे की, शेअरची किंमत 10 रुपये वरून 9,000 रुपये पर्यंत वाढण्यास कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती (Financials) आधार देत नाही. याबद्दल कंपनीने यापूर्वीच स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा महसूल (Revenue) 31.59 कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षातील (FY24) केवळ 38 लाख रुपये महसुलापेक्षा खूप जास्त आहे. FY25 मध्ये कंपनीने 8.4 कोटी रुपये निव्वळ नफा (Net Profit) नोंदवला, तर FY24 मध्ये कंपनीला 1.7 लाख रुपये निव्वळ तोटा झाला होता.

Advertisement

30 जून 2025 पर्यंत प्रवर्तकांकडे (Promoters) कंपनीचा 1.28% हिस्सा होता, तर उर्वरित 98.72% हिस्सा सार्वजनिक शेअरधारकांकडे (Public Shareholders) आहे.

कंपनीच्या एकूण जारी आणि पेड-अप भांडवलापैकी (Issued and Paid-up Capital) 99% हिस्सा प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे (Preferential Allotment) जारी करण्यात आला आहे आणि तो 31 मार्च 2026 पर्यंत 'लॉक-इन' पिरियडमध्ये आहे. बोर्ड सदस्य किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी (Key Managerial Personnel) कंपनीच्या स्टॉकमध्ये कोणताही व्यापार केलेला नाही.

कायदेशीर कारवाई करणार?

सार्वजनिक शेअरधारकांकडे केवळ सुमारे 4,000 शेअर्स डिमॅट स्वरूपात आहेत आणि 'काही व्यक्ती' या शेअर्सचा वापर 'अनैतिकरित्या' व्यापार करण्यासाठी करत आहेत. यामुळे कंपनीची आणि सचिन तेंडुलकरची बदनामी होत असून, कंपनीने या प्रकरणी आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Advertisement

मंगळवारी (14 ऑक्टोबर) RRP सेमिकंडक्टरच्या शेअरची किंमत BSE वर 2% ने वाढून 8,584.75 रुपये प्रति शेअरवर पोहोचली, तर बेंचमार्क सेन्सेक्स 0.36% ने घसरून 82,029.98 अंकांवर बंद झाला. BSE वेबसाइटवरील माहितीनुसार, या शेअरचा 'प्राईस-टू-अर्निग्ज मल्टिपल' (Price-to-Earnings Multiple) मागील चार तिमाहीसाठी 50 पेक्षा जास्त आहे

Topics mentioned in this article