Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज रविवारी 1 फेब्रुवारीला नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यंदाचा बजेट सर्वसामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसल्याचा सूर विरोधकांकडून आवळला जात आहे.दरम्यान, देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात यंदा विशेषत:तरुण आणि बेरोजगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यापासून ते उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून आधीपासूनच उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया,मुद्रा योजना यांसह अनेक योजना राबविल्या जात आहेत. यंदाच्या बजेटमध्ये अनेक नवीन योजनांची घोषणा करण्यात आली असून जुन्या योजनांचाही विस्तार करण्यात आला आहे.सेमीकंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याशिवाय,गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या जात आहेत.त्यामुळे तरुणांसाठीही नोकरीच्या नवी संधी उपलब्ध होणार आहेत.तसच खाजगी विद्यापीठे सुरू करण्यासाठीही सरकारकडून मदत केली जाणार असल्याचं सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Budget 2026: कृषी क्षेत्राला जागतिक ब्रँड बनवण्याची योजना, बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा? वाचा सविस्तर
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह आणि..
अर्थमंत्री सितारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केली की, शहरांमध्ये नवीन आर्थिक क्षेत्रे (इकॉनॉमिक झोन) तयार करण्यात येणार आहेत.देशातील आर्थिक सुधारणा योग्य मार्गावर आहेत.यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यात येईल,तर शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी खाजगी विद्यापीठे उघडण्यात सरकार मदत करणार आहे. या विद्यापीठांमध्ये ग्रामीण भागातील आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विशेष सहाय्य मिळेल.
अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की,लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) नव्या उंचीवर नेणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे.पशुपालनासाठी कर्ज दिले जाईल. काजू आणि कोको उद्योगासाठीही स्वतंत्र योजना प्रस्तावित आहे. यामुळे या क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळेल.तसच आत्मनिर्भर भारतासाठी सीतारमण यांनी 2 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. टियर–2 आणि टियर–3 शहरांचा विकास केला जाईल.5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचाही विकास होणार आहे. यामुळे सर्वसामान्य तरुण आणि बेरोजगारांसाठी उत्तम जीवनमान आणि नवी रोजगार संधी उपलब्ध होतील, अशाही घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केल्या.
नक्की वाचा >> Union Budget 2026 Live: विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प: CM देवेंद्र फडणवीस
कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब तयार करणार
बजेटमध्ये कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे युवा कंटेंट क्रिएटर्सना करिअरसाठी याचा फायदा होईल.
भारतातील AVGC (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात 2030 पर्यंत 20 लाख व्यावसायिकांची गरज भासेल,असा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन 15,000 माध्यमिक शाळांमध्ये आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करण्यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजीजला समर्थन देण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे.