Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

टाटा सन्सचे चेअरमनपद भूषविलेल्या रतन टाटा यांनी उद्योगजगतात टाटा समूहाचा अभूतपूर्व कामगिरीचा झेंडा सातत्याने फडकावत ठेवला

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:
  1. जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात अत्यंत आदराने घेतले जाते. टाटा सन्सचे चेअरमनपद भूषविलेल्या रतन टाटा यांनी उद्योगजगतात टाटा समूहाचा अभूतपूर्व कामगिरीचा झेंडा सातत्याने फडकावत ठेवला होता. 
  2. रतन टाटा हे जमशेटजी टाटा यांचे पणतू. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला होता. नवल आणि सुनी टाटा हे त्यांचे आई वडील होते. 
  3. 1948 साली आईवडील विभक्त झाल्यानंतर रतन टाटा यांचे संगोपन त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केले होते. 
  4. रतन टाटा हे अविवाहीत राहिले. चार वेळा ते बोहल्यापर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही. लॉस एंजलिसमध्ये काम करत असताना आपण एका तरुणीच्या प्रेमात पडलो होतो असे त्यांनी सांगितले होते. मात्र 1962 सालच्या भारत चीन युद्धामुळे तरुणीच्या आईवडिलांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला होता. 
  5. 1961 साली त्यांनी कौटुंबिक व्यवसायात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. टाटा स्टीलचे दैनंदीन कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 
  6. भारतीय अर्थव्यवस्थेने उदार धोरण स्वीकारले आणि रतन टाटा यांनी भविष्यातील संधी तसेच आव्हाने ओळखून टाटा समूहाची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले. व्यवसाय करत असताना मध्यमवर्गाला त्यांनी सातत्याने डोळ्यासमोर ठेवले होते. टाटा नॅनो आणि टाटा इंडिका या दोन गाड्या त्यांच्या कल्पनेतून उतरल्या होत्या ज्या मध्यम वर्गाला सहज परवडू शकतील या उद्देशानेच तयार करण्यात आल्या होत्या. 
  7. त्यांच्या कार्यकाळात 'टाटा टी' ने टेटलीवर ताबा मिळवला, टाटा मोटर्सने जॅग्वार लँड रोव्हर आणि टाटा  स्टीलने कोरस कंपनी आपल्या ताब्यात घेतली. 
  8. जगातील सगळ्यात स्वस्त कार बनवून दाखवेन असा निर्धार रतन टाटा यांनी केला होता. अवघ्या 1 लाखात मिळणारी टाटा नॅनो बाजारात आणून त्यांनी आपला निर्धार पूर्ण केला होता.  हा ऑटो क्षेत्रातील एक मोठा चमत्कारच होता. 
  9. टाटा यांच्या X वरील फॉलोअर्सची संख्या 1.2 कोटींपेक्षा जास्त आहे. रतन टाटा हे सर्वाधिक फॉलोअर्स असणारे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध झाले. 
  10. रतन टाटा यांनी जमशेदजी टाटा यांची परंपरा अखंडपणे चालू ठेवली. त्यांनी टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या श्वानांना आश्रय कायम मिळत राहील याची तरतूद केली.  बॉम्बे हाऊसमध्ये श्वानांसाठी अन्न, पाणी, खेळणी याची तरतूद करण्यात आली. 

Topics mentioned in this article