अर्थविषयक व्हिडीओ, पॉडकास्ट करून प्रसिद्ध झालेल्या अभिषेक कर याचे इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अशा या फिन्फ्लुएन्सर अभिषेकला त्याने केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी लागली आहे. आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाने X वर एक पोस्ट केली होती. यामध्ये म्हटले होते की अभिषेकने केलेली विधाने ही अस्वीकारार्ह आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेल्या या भूमिकेनंतर अभिषेकने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Riya Upreti नावाचा युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ हा सध्या बराच पाहिला जातोय. या व्हिडीओमध्ये अभिषेकने तंत्र-मंत्राबाबत विधान केले होते. आसामच्या इतिहास-परंपरा यांच्याबाबत अभिषेकने केलेली ही विधाने अयोग्य असल्याचे आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे आहे. अशा प्रकारची भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता. X वर केलेल्या पोस्टद्वारे हा इशारा देण्यात आला होता आणि त्यामध्ये अभिषेकचा फोटोही शेअर करण्यात आला होता. पोलीस आसामचे महासंचालक जीपी सिंग यांनी काही मिनिटांतच मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या पोस्टला प्रतिसाद देण्यात आला. त्यांनी म्हटले की, "सदर प्रकाराची दखल घेण्यात आली आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल."
या सगळ्या घडामोडींनंतर अवघ्या काही तासात अभिषेकने माफी मागितली. मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्याने म्हटले की ज्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता, तिथून व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले आहे. अभिषेकने म्हटले आहे की, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांची मी माफी मागतो. माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, यापुढे माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही याची मी काळजी घेईन.
अभिषेकने हात जोडून माफी मागितली. त्याने म्हटले की माझ्याकडून झालेले हे कृत्य अजाणतेपणी झाली आहे, वाद निर्माण व्हावा असा माझा उद्देश नव्हता. मात्र या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. यापुढे बोलताना आपण माहितीची दोनदा खातरजमा करू असे आश्वासनही त्याने दिले आहे.
अभिषेक कर हा अर्थविषयक व्हिडीओ बनवतो आणि त्यातून तो सल्ले देत असतो. अभिषेक त्याच्या फॉलोअर्सने गुंतवणूक कशी करावी आणि स्टार्टअपबाबतची माहिती देत असतो. अभिषेकचे युट्युबवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिषेकने रिया उपेरती यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये आसामच्या मायोंगमधल्या एका कथिक महिलेबद्दल विधान केले होते. अभिषेकने म्हटले होते की ही महिला पारलौकीक शक्तींचा वापर करते. ही महिला माणसाला बकरी बननू शकते आणि बकरीपासून त्याला पुन्हा माणूसही करू शकते. तंत्र-मंत्राचा भाग म्हणून ती सेक्सही करते असे अभिषेकने म्हटले होते.