यंदाचा महाकुंभ मेळा (MahaKumbh Mela 2025) उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ मेळ्यासाठी भाविक गर्दीचे सगळे उच्चांक मोडतील अशी आसा व्यक्त केली जात आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातून भाविक महाकुंभ मेळ्यासाठी येणार आहेत. या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार प्रयत्न करत आहेच शिवाय या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी अदाणी समूह देखील पुढे सरसावला आहे. अदाणी समुहाने इस्कॉनच्या सहकार्याने 'महाप्रसाद सेवा' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण काळामध्ये महाप्रसाद सेवा दिली जाणार आहे, ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X र पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, कुंभ मेळा ही सेवेसाठीची ती तपोभूमी आहे जिथे सगळे हात परमार्थासाठी पुढे येतात. मला आनंद आहे की महाकुंभासाठी आम्ही इस्कॉनच्या सहकार्याने भाविकांसाठी 'महाप्रसाद सेवा' सुरू करत आहोत. या ठिकाणी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लाखो लोकांना नि:शुल्क भोजन उपलब्ध होईल. या संदर्भात इस्कॉनचे गुरु प्रसाद स्वामी यांची भेट झाली. सेवेसाठीच्या त्यांच्या समर्पणाची शक्ती जवळून अनुभवता आली. सेवा हीच राष्ट्रभक्तीचे सर्वोच्च रुप आहे. सेवा म्हणजेच साधना, सेवा म्हणजेच प्रार्थना आणि सेवा म्हणजेच परमात्मा आहे."
अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी आणि इस्कॉनचे गुरु प्रसाद स्वामी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीनंतर अदाणी यांनी महाप्रसाद सेवेबद्दलची माहिती दिली. गुरु प्रसाद स्वामी यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना म्हटले की, अदाणी समुहाने सातत्याने समाजाप्रती उत्तरदायित्वाची आणि समाजसेवेची जबाबदारी पार पाडली आहे. गौतम अदाणी यांचा साधेपणा ही त्यांची उजवी बाजू आहे. स्वार्थ बाजूला सारत ते भूमिका मांडत असतात. आम्ही त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभारी आहोत. समाजाला आपण देणे लागतो, त्यासाठी अदाणी यांनी घेतलेल्या पुढाकार हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
( नक्की वाचा : Mahakumbh Conclave : 'महाकुंभाचा फक्त प्रयागराजला नाही तर संपूर्ण देशाला फायदा' )
महाप्रसाद सेवेचा लाभ 50लाख भाविक घेतील असा अंदाज आहे. या भाविकांसाठी जेवण बनविण्यासाठी दोन किचन बनविण्यात येणार आहेत . महाकुंभ मेळ्यामध्ये 40 ठिकाणी महाप्रसाद देण्यात येणार असून 2500 स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक, बालकांसह असणाऱ्या महिला यांच्यासाठी गोल्फ कार्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय 'गीता सार' च्या 5 लाख प्रती भाविकांना दिल्या जाणार आहे.