दसऱ्यापूर्वी मोठा अपघात टळला, त्रिचीमध्ये तातडीनं उतरवलं विमान, 141 प्रवाशांचा जीव वाचला!

तामिळनाडूमधील त्रिचीमधून शारजाहला जाणाऱ्या 'एअर इंडिया एक्स्प्रेस'च्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानात 141 प्रवासी होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

संपूर्ण देशाला आता विजयादशमी म्हणजे दसऱ्याचे वेध लागले आहेत. नवरात्र आणि दुर्गा उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण देशात उत्सवी वातावरण आहे. या वातावरणाला गालबोट लागणारी एक दुर्घटना थोडक्यात टळली. तामिळनाडूमधील त्रिचीमधून शारजाहला जाणाऱ्या 'एअर इंडिया एक्स्प्रेस'च्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानात 141 प्रवासी होते.

या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे त्याला त्रिची विमानतळावर पुन्हा उतरवण्यात आले. हवेत घिरट्या घालून विमानातील इंधन कमी करण्यात आले. त्यानंतर विमानानं आपत्कालीन लँडींग केलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. 

काय झालं होतं?

याबाबत मिळलेल्या वृत्तानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX613 विमानानं शुक्रवारी (11 ऑक्टोबर) संध्याकाळी 5.32 वाजता त्रिची विमानतळावरुन उड्डाण घेतलं. विमानानं उड्डाण घेताच त्यामधील हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं लँडींग करण्याची परवानगी मागितली. दोन तासांपेक्षा जास्त हवेत फिरुन ते इंधन कमी करण्यात आलं. त्यानंतर हे विमान उतरवण्यात आलं. 

इंधन खाली टाकलं

तांत्रिक बिघाडामुळे विमानाला परत फिरण्याची सूचना देण्यात आली. त्रिची विमानतळवरही त्याची तयारी करण्यात आली होती. पण, पूर्ण इंधनासह विमान उतरवणे धोकादायक होते. त्यामुळे पायलटनं विमानतळाच्या बाजूला हवेतच काही इंधन बाहेर टाकलं. 

विमानतळ होतं सज्ज

त्रिची विमानतळावर हे विमान उतरत असताना सर्व यंत्रणा सज्ज होती. अग्निशमन दल तसचं रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात सज्ज होता. यावेळी विमानातील प्रवासी तसंच विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. सर्वजण विमान सुरक्षित उतरावं यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करत होते. त्यांच्या या प्रार्थनेला अखेर यश आलं आणि मोठा अपघात टळला. 

Topics mentioned in this article