रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रालयाने रोहित पवारांचे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. तसेच या अपघाताबाबत कोणतीही दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, असं आवाहनही मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाचे स्पष्टीकरण
रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलं की, या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आगामी 30 दिवसांत सादर केला जाईल. महत्त्वाचं म्हणजे, या अपघातानंतर लगेचच 4 फेब्रुवारी रोजी संबंधित कंपनीचं ऑडिट करण्यात आलं असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल.
या अहवालात जर काही त्रुटी आढळल्या तर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. तसेच व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी ऑपरेशन्ससाठी विशेष ऑडिट सध्या राबवलं जात आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )
डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आणि तपास
अपघाताच्या तांत्रिक तपासाबाबत माहिती देताना मंत्रालयाने स्पष्ट केलं की, विमानाचा डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर दिल्लीत डाऊनलोड करण्यात आला आहे. मात्र, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरला उष्णतेमुळे थर्मल डॅमेज झालं आहे. डीजीसीएने 2025 मध्ये व्हीएसआर (VSR) कंपनीचे ऑडिट केलं होतं.
त्याशिवाय नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्सचे 51 नियामक ऑडिट देखील करण्यात आले आहेत. कंपनीची उड्डाण सुरक्षा प्रणाली, वैमानिकांच्या ड्युटीची वेळ, देखभाल आणि कागदपत्रे या सर्व बाबींची वेळोवेळी तपासणी केली गेल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.
रोहित पवारांचे गंभीर आरोप
आमदार रोहित पवार यांनी या अपघाताला 'घातपात' असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या मते, विमानात प्रमाणापेक्षा जास्त इंधन भरलं होतं, ज्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मुंबईहून निघताना फुल टँक इंधन भरण्याची गरज नव्हती, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच खराब हवामान असतानाही वैमानिकाने विमान पुन्हा मुंबईला नेण्याऐवजी तिथेच का ठेवले, असा प्रश्न त्यांनी विचारला. वैमानिकाकडे योग्य विमानाचे प्रशिक्षण होते का आणि त्यांची बीए (BA) टेस्ट नियमित केली जात होती का, असे तांत्रिक मुद्देही त्यांनी मांडले होते.
विमानाची स्थिती आणि कंपनीची भूमिका
रोहित पवारांनी असाही आरोप केला होता की, ज्या विमानात अजित पवार बसले होते, त्या इंजिनची क्षमता संपत आली होती. विमानाचे 5915 तास पूर्ण झाले होते आणि फक्त 85 तास शिल्लक होते. त्यामुळे खराब झालेले मशीन जाणीवपूर्वक अजित पवारांच्या सेवेसाठी दिले गेले का, असा त्यांचा सवाल होता. यासोबतच ब्लॅक बॉक्स जळण्याबाबत त्यांनी संशय व्यक्त करत हे मॅन्युप्युलेशन असल्याचं म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.